पुणे : आपल्या देशात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल टाकण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार १ हजार कोटी लिटर इथेनॉल लागणार आहे. तेवढे उत्पादन करण्याची आपल्या साखर कारखान्यांमध्ये क्षमता नाही. येणाऱ्या काळात ऊसाचे दर कमी होणार नाहीत, मात्र साखरेचे दर कमी होऊ शकतील. त्यामुळे येणाऱ्या काळात साखर उद्योग इथेनॉलकडे वळविणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे शासनाने पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करण्यास पुढाकार घ्यावा, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
गडकरी म्हणाले, नव्या तंत्रज्ञानामुळे इथेनॉलचे उपयोगिता मूल्य पेट्रोल एवढेच होणार असल्याने त्यांच्या किंमतीवरही फरक होईल. इथेनॉल हे हरित इंधन आहे, त्यामुळे प्रदूषण कमी होते. पुण्यात इंडियन ऑईलचे तीन पंप सुरू करण्याच्या सूचना कंपन्यांना करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्यासोबत पुण्यातील प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल. त्यामुळे शासनाने पुण्यात इथेनॉलचे पंप सुरू करण्यास पुढाकार घ्यावा. इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांना समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही.
आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कृषि आणि ग्रामीण क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी आणि निगडीत क्षेत्राचे प्रमाण केवळ १२ टक्के आहे. शेतकरी संपन्न झाल्याशिवाय देशाच्या प्रगतीत अनेक अडचणी आहेत. आकांक्षित जिल्ह्यातही शेतीला समृद्ध केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. यादृष्टीने साखर उद्योग हा कृषि आणि ग्रामीण क्षेत्राच्यादृष्टीने महत्वाचा आहे.
येत्या काळात संशोधनाला खूप महत्व आहे. कृषि क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोगाद्वारे बदल घडवून आणणे गरजेचे आहे. ज्ञानाचे आर्थिक सुबत्तेत परिवर्तन करणे आवश्यक आहे. भविष्यात आपल्या देशात २५ लाख कोटी इंधन आयातीसाठी खर्च करावा लागणार आहे. रस्ते वाहतूकीत वाढ होऊन वाहनांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे इथेनॉल, मिथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रीक या पर्यायांना खूप वाव आहे, असेही गडकरी म्हणाले.