लोकांची बऱयाच काळापासूनची मागणी पूर्ण, 75 दिवसांत काम पूर्ण होणार : सभापती तवडकर
प्रतिनिधी /काणकोण
गुळे ते बाळ्ळीपर्यंतच्या चर्चेत असलेल्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाचा शुभारंभ 24 रोजी काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर आणि केपे मतदारसंघाचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून करण्यात आला.
या रस्त्याचे डांबरीकरण केवळ ठेकेदाराचा मनमानी कारभार आणि वेळकाढू धोरणामुळे रखडले होते. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन झाली. त्यावर बोट ठेवून या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी लघुनिविदा काढण्यात आली आणि सौझा या ठेकेदाराकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात आली. याकामी अवघ्या पंधरा दिवसांत सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कामाचा शुभारंभ करण्यात आल्याचे तवडकर यांनी सांगितले.
या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण व्हावे यासाठी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस जनार्दन भंडारी यांनी आंदोलन केले होते याची आठवण सभापतींनी यावेळी काढली. तर राष्ट्रीय हमरस्ता 66 वरील पाडी ते बाळ्ळीपर्यंतचा भाग केपे मतदारसंघात येतो. या रस्त्यावरून दैनंदिन जे लोक प्रवास करतात त्यांचा खचितच सरकारला आशीर्वाद मिळेल. विकासाच्या बाबतीत नेहमीच आपला सरकारला पाठिंबा असल्याचे केपेचे आमदार डिकॉस्ता यांनी सांगितले.
गुळे ते बाळ्ळी या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी बऱयाच काळापासून होत होती. याप्रसंगी काणकोण पालिकेचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो, अन्य नगरसेवक, काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष विशाल देसाई आणि अन्य पदाधिकारी, श्रीस्थळचे माजी सरपंच गणेश गावकर व अन्य पंच, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दत्तप्रसाद कामत आणि साहाय्यक अभियंते तसेच कनिष्ठ अभियंते, ठेकेदार सौझा आणि अन्य उपस्थित होते. 75 दिवसांच्या कालावधीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती तवडकर यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष रिबेलो त्याचप्रमाणे विशाल देसाई यांनी या कामाला प्रारंभ केल्याबद्दल सभापती तसेच सरकारचे अभिनंदन केले.