तीन दिवसात विज्ञानाशी निगडीत स्पर्धा : माध्यमिक शाळेतील विद्यार्थीही सहभागी होणार
प्रतिनिधी / बेळगाव
एसकेई सोसायटी संचालित जीएसएस पीयू कॉलेजच्यावतीने गुरुवारपासून ‘मिराकी युवा महोत्सव’ला उत्साहात प्रारंभ झाला. मिराकी सायन्स आणि संस्कृत फेस्टिव्हल या तीनदिवशीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज शिंदे, एसकेईचे व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, सदस्य बिंबा नाडकर्णी, बी. डी. कलघटगी, विनायक जाधव, प्राचार्य प्रणव पित्रे, प्रा. अनिल खांडेकर, प्रा. कीर्ती फडके आदी उपस्थित होते.
प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत व प्रार्थना सादर केली. प्राचार्य प्रणव पित्रे यांनी स्वागत केले. प्रा. साक्षी कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत झाले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
यावेळी एएसआय धर्मराज शिंदे म्हणाले, कॉलेजस्तरावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या विज्ञानाशी संबंधित स्पर्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱया आहेत. विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड ओळखून यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
यावेळी एस. वाय. प्रभू म्हणाले, विज्ञानाशी निगडीत शिक्षणप्रणालीमुळे समाजाचा विकास होतो. त्यामुळे विद्यार्थीदशेतच विद्यार्थ्यांना विज्ञानाशी संबंधित अनेक कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.
या तीन दिवसांमध्ये विज्ञानाशी निगडीत सर्व प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये प्रश्नमंजुषा, वैज्ञानिक प्रकल्प, नृत्य, गायन, भाषण, ट्रेजर हंट, चित्रफिती तयार करणे, छायाचित्रे, रोबोटिक्स, टोस्टमास्टर, बोधकथा, चित्रकला, नाटक, शालेय गुणात्मक स्पर्धा, विविध सायन्स मॉडेल्सचे प्रदर्शन आदी आयोजित केले आहे. यामध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे.
अलीकडे स्पर्धेचे युग निर्माण झाले आहे. अशा युगात विविध विकासासाठी सायन्स आवश्यक आहे. विज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा अभ्यास करून त्यांच्यात नवीन गुण रुजविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.