30 जूनपर्यंत चालणार जुना पास : नवीन विद्यार्थ्यांचे काय?
प्रतिनिधी /बेळगाव
शाळांना प्रारंभ झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी लवकरच बसपास प्रक्रियेला प्रारंभ केला जाणार आहे. अशी माहिती परिवहन मंडळाने दिली आहे. सध्या जुन्या बसपासची मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 30 जून पर्यंत जुना बसपास दाखवून प्रवास करता येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवास करणे सुखकर व्हावे यासाठी लवकरच नवीन बसपास प्रक्रियेला प्रारंभ केला जाणार आहे.
बेळगाव विभागात बेळगावातील 4 आगारासह बैलहोंगल, खानापूर आणि रामदुर्ग आगाराचा समावेश आहे. या सात आगारातून दरवषी 76 हजारहून अधिक विद्यार्थी बसपास मिळवितात. मात्र मागील दोन वर्षांत कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाल्याने बसपास प्रक्रियाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बसपास घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती. मात्र यंदा शैक्षणिक वर्षाला सुरळीत प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बसपास घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जुन्या पासची मुदत 30 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. मात्र यंदा नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय प्रवासासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यासाठी लवकरच बसपास प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यंदादेखील बसपास प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने चालणार आहे. विद्यार्थ्यांना बसपाससाठी सेवा सिंधू संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर अर्जाची रितसर पाहणी करून बसपास उपलब्ध करून दिला जाणार आहे.
पूर्वीप्रमाणेच बसपास वितरित करावेत
मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन बसपास प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया वेळखावू आणि किचकट असल्याने विद्यार्थ्यांना बसपास मिळविताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच बसपास वितरित करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.