स्थानिक-लांब पल्ल्याच्या बससाठी नवीन प्लॅटफॉर्म उभारणार
प्रतिनिधी / बेळगाव
बसस्थानक आवारात असलेले तात्पुरते बसस्थानक हटविण्यास गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. मागील पाच वर्षांपासून या तात्पुरत्या बसस्थानकातून प्रवासी वाहतूक सुरू होती. मात्र आता या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार असल्याने तात्पुरते बसस्थानक हटविले जात आहे. याबरोबरच येथील बसची व्यवस्था इतरत्र करण्यात आली आहे.
स्मार्ट बसस्थानकाचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. कोरोना आणि इतर कारणाने हे काम लांबणीवर पडले होते. आता पुन्हा कामाला सुरुवात झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याबरोबरच प्लॅटफॉर्म व इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच बसस्थानकातील तात्पुरते बसस्थानक हटवून या ठिकाणी देखील प्लॅटफॉर्म उभारला जाणार आहे. याबरोबरच शौचालय आणि कार्गो कार्यालय देखील उभारले जाणार आहे.
स्मार्ट बसस्थानकाच्या कामाला सुरुवात झाली. त्यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली होती. याठिकाणी बसथांबे उभारून स्थानिक आणि लांब पल्ल्याची बस वाहतूक सुरू होती. एकाच ठिकाणी शहरी आणि लांब पल्ल्याच्या बस थांबत असल्याने प्रवाशांची गर्दी होत होती. शिवाय बस थांबविताना अडथळा निर्माण होत होता. आता हे तात्पुरते बसस्थानक हटवून याठिकाणी सुसज्ज असा प्लॅटफॉर्म उभारला जाणार आहे. शिवाय स्थानिक, शहरी आणि लांब पल्ल्याच्या बसेससाठी वेगवेगळय़ा ठिकाणी प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. त्याबरोबर महाराष्ट्राच्या लालपरीसाठी देखील स्वतंत्र प्लॅटफॉर्म उभारला जाणार आहे.