Tarun Bharat

काटामारी थांबविण्यासाठी भातकेंद्रे सुरू करा

दलालांकडून शेतकऱयांची मोठय़ाप्रमाणात लूट, दरातही तफावत असल्याने आर्थिक फसवणूक : आधारभूत किंमतीची गरज

वार्ताहर /खानापूर

खानापूर तालुक्यातील सुगी हंगाम जोरात सुरू आहे. भातकापणी, बांधणी व  मळणी शेतकरी करत आहेत. शेतकऱयांकडून शेतातील खळय़ावर व्यापाऱयांना भातविक्री करण्यात येत आहे. याच संधीचा लाभ व्यापाऱयांनी उठविला आहे. कमी दराने भात खरेदी सुरू केली आहे. त्यातही काटामारी सुरू असल्याने शेतकऱयांचे आर्थिक नुकसान होत आहे.

खानापूर तालुक्यातील शेतकऱयांनी प्रामुख्याने अभिलाष, मटाळगा, साळी, दोडगा, इंद्रायणी, इंटाण, अमन, सोनम, साईराम, जया, राजा हिंदुस्थानी, आयआर 64, रामू आदी जातींच्या भाताचे उत्पादन घेतले आहे.

भातपीक पिकविण्यासाठी शेणखत, रासायनिक खते, मजूर, टॅक्टर भाडे यासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. उत्पादनाच्या मानाने खर्चच अधिक होत आहे. त्यामुळे शेती करणे शेतकऱयांना परवडणारे नाही. केवळ वर्षभर स्वतःचे पीकविना शेत ठेवू नये यासाठी भातलागवड केली जाते.

प्रतिक्विंटल 500 रुपयाची तफावत

गत सप्टेंबर महिन्यात अभिलाषा भाताला प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये दर होता. आज हेच दलाल सदर भात केवळ 2000 रु. दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे प्रतिक्विंटलला 500 रु. कमी दर मिळत आहे. शिवाय दलाल एवढय़ावर थांबलेले नाहीत. त्यांनी काटामारी सुरू ठेवली आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक तराजू आले आहेत. त्या वजनकाटय़ावर भात खरेदी सुरू आहे. त्याचा रिमोट दलाल किंवा त्याची माणसे आपल्या खिशात ठेवतात. आपणाला आवश्यक तेवढी काटामारी करून घेण्याचा प्रकार घडतो. शेतकऱयांना याची पुसटची कल्पनासुद्धा येत नाही. काही ठिकाणी अशा प्रकाराला विरोध दर्शवून शेतकऱयांनी दलालाना घरी पाठविले आहे.

भात खरेदीसाठी दलालांमध्ये स्पर्धा

भात खरेदीसाठी दलालांमध्ये स्पर्धा सुरू असल्याने आता हा काटामारीचा धंदा लपून राहिलेला नाही. आपण प्रामाणिक दलाल आहोत. अन्य दलाल काटामारी करीत आहेत. अशी सूचनाही ते शेतकऱयांना देताना दिसत आहेत. ही वस्तुस्थिती सत्य असली तरी ‘आम्ही दोघे भाऊ भाऊ वाटून खाऊ’ हा प्रकार सुरू आहे.

शासनाने काही पिकांना आधारभूत किमत जाहीर केली आहे. परंतु भाताला अद्याप आधारभूत किंमत जाहीर केली नाही. यापूर्वी बेळगाव व नंदगड येथे भातकेंद्रे सुरू करून भाताची खरेदी केली होती. परंतु गेल्या दोन-तीन वर्षात भात खरेदी केंद्रेच सुरू न केल्यामुळे म्हणावा तसा दर मिळालेला नाही.

सध्याचा भाताचा दर

अभिलाषा 2100, मटाळगा 2150, साळी 2100, दोडगा 2100, इंद्रायणी 2150, अमन 2000, सोनम 2000, साईराम 2000, जया 2100, राजा हिंदुस्थानी 1700 रुपये.

Related Stories

मुलांना पुस्तके वाचण्याची सवय लावा

Patil_p

श्रावणी गडकरी युनिव्हर्सिटी ब्ल्यू

Amit Kulkarni

वीजतारेच्या स्पर्शाने गवत भरलेल्या ट्रॉलीला आग

Amit Kulkarni

गणेशपूरला जाणाऱया रस्त्यावर हेल्मेटची सक्ती

Amit Kulkarni

एनएफसीआय हॉटेल मॅनेजमेंटचा विक्रम

Amit Kulkarni

आरटीओ सर्कल सोन्यामारुती मंदिरात महापूजा-महाप्रसाद

Patil_p