इस्लामपूरप्रतिनिधी
बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारुची कंटेनरमधून वाहतूक करणाऱया दोन अटक आरोपी पैकी शंकर रामचंद्र पवार (रा. विजयनगर, मोहोणे, ता. कल्याण, जि.ठाणे) याने राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱयांच्या हातावर तुरी देवून पलायन केले. कार्यालयात प्रातःविधीचे निमित्ताने बाहेर पडून उत्पादन शुल्कच्या जवानांना हिसडा देवून मुख्य प्रवेशव्दाराला बाहेरुन कडी लावून त्याने पळ काढला. ही घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
संदीप लक्ष्मण भोसले (37, रा. कालवडे, ता. कराड), असे दुसऱया संशयीत आरोपीचे नाव आहे. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कचे इस्लामपूर निरीक्षक प्रशांत रास्कर यांना पुणे-बेंगलोर अशीयायी मार्गावरुन परराज्यातून अवैध दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. हा वाहतूक करणारा कंटेनर वाळवा तालुक्यातील येलूर हद्दीत सेवा रस्त्यावर एच.पी.पेट्रोल पंपाजवळ असल्याची माहिती मिळाली.
रास्कर यांनी आपल्या कार्यालयातील दुय्यम निरीक्षक शंकर रणपिसे, अविनाश घाटगे, उदय पुजारी, जवान संतोष वेदे, राकेश बनसोडे यांच्याशी चर्चा करुन सापळा लावला. हे पथक येलूर येथे पोहोचले त्यावेळी संशयीत वाहन व दोघेजण मिळून आले. त्या ठिकाणी एक कार ही होती. चौकशी करुन कंटेनरची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अवैद्य दारुचा साठा आढळला. या कंटेनर मध्ये 180 मिलीच्या 3 हजार 840 बाटल्या मिळून आल्या. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दोन संशयितांसह एक मोटार कार एमएच 50 एल 9970, कंटेनर एमएच 12 क्यूजी 2279 ही वाहने ताब्यात घेतली.
आरोपींना कार्यालयात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी ही दारु गोवा येथून आणल्याचे सांगून गुह्याची कबुली दिली. त्यांच्या विरुध्द मुंबई दारु बंदी अधिनियम कायदा कलम 65 (अ), (ई), 80, 81, 83, 90, 108He´ceeCes गुन्हा दाखल करुन दोघांना अटक करण्यात आली. तेंव्हा पासून ते तपासकामी ताब्यात होते. सोमवारी सकाळी बनसोडे व वेदे हे जवान डयुटीवर असताना पवार याने प्रातःविधीसाठी जायचे असल्याचे सांगितले. त्यास घेवून प्रसाधन गृहाजवळ गेल्यानंतर पवार याने बनसोडे यांच्या हातास हिसडा देवून जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर कार्यालयातील मुख्य दरवाजातून बाहेर जावून बाहेरुन कडी लावून पळ काढला. आवाजाने कार्यालयातील जावान वेदे हे पोहोचले. तो पर्यंत आरोपी पवार पळून गेला होता.
दोघांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण यश आले नाही. त्यामुळे त्यांनी कार्यालयाबाहेर असणारे साई हॉटेल चालक संतोष पाटील यांना फोन वरुन बोलावून घेवून दरवाजा उघडला. त्यानंतर परिसरात त्याचा शोध घेतला. पण पवार हा मिळून आला नाही. वरिष्ठांना कल्पना देवून पुन्हा त्याचा शोध घेवून ही तो मिळाला नाही. त्यामुळे सोमवारी सायंकाळी बनसोडे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली.