राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीवर प्रामुख्याने चर्चा
प्रतिनिधी /पणजी
गोवा मुख्याध्यापक संघटनेतर्फे आयोजित द्वितीय राज्यस्तरीय परिषदेचे दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे.
मंगळवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे माजी अध्यक्ष तथा परिषदेचे समन्वयक विलास सतरकर यांनी ही माहिती दिली.
नवी दिल्लीतील एनआयईपीए तसेच गोवा समग्र शिक्षा यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवशीय निवासी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जुने गोवे येथील सेंट जोझफ वाझ स्पिरिच्युअल रिनिवल केंद्रात होणाऱया सदर परिषदेत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या यशस्वी अंमलबजावणीसंदर्भात सखोल चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण होणार आहे.
परिषदेत राज्यभरातील सुमारे 250 शाळांचे प्रमुख उपस्थित राहणार असून दोन्ही दिवसात होणाऱया विविध विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्रे, गट चर्चा यात ते सहभाग घेणार आहेत. त्याशिवाय नविन्यपूर्ण संकल्पना, मानसिक स्वास्थ्यासाठी योग, डान्स, प्रात्यक्षिके यांचे सादरीकरण होणार आहे. ’21 व्या शतकातील कौशल्ये ः विद्यार्थी-शिक्षकांचा सहभाग’ यावर निर्मला इन्स्टिटय़ूटच्या रसेल डिसोझा यांच्यातर्फे विशेष सत्र होईल.
दुसऱया दिवशी दुपारी 12 वाजता संघटनेची आमसभा होणार असून त्यावेळी राज्यातील एकुणच शैक्षणिक तथा शाळांची स्थिती यावर चर्चा करण्यात येईल. दुपारी 2.30 वाजता शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल, अशी माहिती सतरकर यांनी दिली.
परिषदेतील चर्चासत्रे, गटचर्चा, डान्स, योग याद्वारे एनआयईपीए चे डॉ. कश्यपी अवस्थी, नवी दिल्लीतील सीआयई विद्यापीठाच्या डॉ. प्रीती मिश्रा, गोवा समग्र शिक्षा चे राज्य प्रकल्प संचालक डॉ. शंभू घाडी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे राज्य सदस्य पांडुरंग नाडकर्णी आणि विलास सतरकर, वेर्णा येथील फा. आग्नेल स्कूलचे मुख्याध्यापक कोर्नोड मेंडिस, सिसिल रॉड्रिगीश, डॉ. सुरज काणेकर, रघुराम अनंथोज, प्रमोद आचार्य आदी मान्यवर सहभाग घेणार आहेत. पत्रकार परिषदेस संघटनेचे अध्यक्ष माधव खारवी, सचिव ईरविन कुलासो, म्हाळसाकांत देशपांडे, मारियानो वालादारीस आदींची उपस्थिती होती.