दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना घेतले ताब्यात
प्रतिनिधी/ सातारा
तारगांव (ता. कोरेगाव) च्या हद्दीत गोवा राज्यातील दारूचा वापर करून तयार करण्यात येणाऱया बनावट विदेशी दारू निर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क सातारा विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. याप्रकरणी अक्षय राजेंद्र जाधव (वय 27, रा. दुर्गळवाडी पो. तारगांव ता. कोरेगाव) व हर्षवर्धन भगवान कर्चे (वय 23, रा. पाचेगांव ता. सांगोला) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 58 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क सातारा विभागाने दिलेली माहिती अशी, तारगांवच्या हद्दीत गोवा राज्यातील दारूचा वापर करून बनावट विदेशी दारूची निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भरारी पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी अक्षय जाधव व हर्षवर्धन कर्चे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 750 मि.ली च्या गोवा बनावट विदेशी दारू ऐस ब्ल्यु फाईन व्हीस्कीच्या 45 बाटल्या, 180 मि. ली. क्षमतेच्या प्रथमदर्शनी बनावट विदेशी दारू इम्पिरीयल ब्ल्यु व्हीस्कीच्या एकून 188 सिलबंद बाटल्या, 300 मोकळ्या बाटल्या, 700 नग बुचे, तीन मोबाईल सेट, दोन दुचाकी वाहने असा एकूण 1 लाख 58 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या दोघांविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत निरीक्षक संजय साळवे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, नितीन जाधव, जवान सचिन खाडे, अजित रसाळ, जीवन शिर्के, भिमराव माळी, उर्वेश पाटील यांनी सहभाग घेतला. गुह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर करीत आहेत.
बनावट दारू निर्मिती, विक्रीची माहिती द्या
सातारा जिह्यामध्ये कोणत्याही प्रकारची बनावट दारू निर्मिती, विक्री, वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले तर त्यांची माहिती राज्य उत्पादन शुल्क सातारा यांना तत्काळ देण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क साताराचे अधीक्षक वैभव वैद्य यांनी केले आहे.