पुणे / प्रतिनिधी :
कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी करणी सेनेचा प्रमुख अजय सिंह सेंगर याच्यावर पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते राहुल धर्मा डंबाळे (वय 39) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार राहुल डंबाळे हे 29 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी एका न्यूज चॅनेलवर बातम्या पाहत होते. त्यावेळी एका वृत्तवाहिनीवर करणी सेनेचा कोरेगाव भीमा कार्यक्रमास विरोध असल्याबाबतची बातमी सुरू होती. त्या बातमीमध्ये करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने वादग्रस्त वक्तव्य करून तक्रारदार यांच्यासह समस्त दलित समाजाच्या भावना दुखावून धार्मिक श्रद्धांचा अपमान केलेला आहे. म्हणून पोलिसांनी याप्रकरणी करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. कवितेक करत आहेत.
अधिक वाचा : नवीन वर्षात राज्यात थंडीची सलामी