नियमानुसार काम सुरू नसल्याची तक्रार : कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
निलजी ग्राम पंचायत अखत्यारित येणाऱया शिंदोळी गावामध्ये ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या अचानक येऊन रस्त्याचे उद्घाटन करत आहेत. नियमानुसार कोणतेही काम सुरू नाही. कामासाठी टेंडर काढले जात नाही. गावाच्या लोकांना विश्वासात घेतले जात नाही. एकप्रकारे त्यांनी कायद्याचे उल्लंघन करून उद्घाटन केल्याचा आरोप शिंदोळी ग्रामस्थांनी केला असून त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी शिंदोळी ग्राम पंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोणत्या निधीतून रस्ता किंवा काम केले जाते, याची माहिती ग्रा. पं. ला दिली पाहिजे. रस्ता किंवा कोणतेही काम करायचे असेल तर त्यासाठी निविदा काढली पाहिजे. उद्घाटन करताना ग्राम पंचायत अध्यक्ष व सदस्यांना कळविले पाहिजे. आमदार नसताना त्यांचा मुलगा मृणाल हेब्बाळकर हा गावामध्ये येतो आणि उद्घाटन करतो, हे योग्य आहे काय? प्रोटोकॉल पाळला जात नाही. तेव्हा संबंधित आमदारांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन दिले. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा मिलन मातारी, ग्रा. पं. सदस्य सतीश शहापूरकर, सविता मुचंडी, वीरभद्र पुजार, सुनीता तळवार, सागर मुचंडी, रेखा शहापूरकर यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.