मोबाईलची दोन दुकाने फोडली
कणकवली / प्रतिनिधी-
कणकवली शहरासह तालुकाभरात घर, दुकान, मंदिर, फ्लॅटफोड्यांचे सत्र सुरुच आहे. सोमवारी रात्रीही कणकवली शहरातील जुने भाजी मार्केट येथील मोबाईलची दोन दुकाने चोरट्यांनी फोडली. दोन्ही घटना मंगळवारी सकाळी ८ वा. सुमारास उघडकीस आल्या. दोन्ही ठिकाणी मिळून मोबाईल, चार्जर, मेमरीकार्ड व मोबाईलशी संबंधित साहित्य मिळून २३ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. फोडलेल्या दुकानांमध्ये ज्ञानदेव श्रीधर मोडक ( हरकुळ बुद्रुक) यांचे सिद्धविनायक मोबाईल शॉपी या नावाचे मोबाईल दुरुस्तीचे दुकान तसेच रविकांत मधुकर जाधव (शिवडाव) यांचे जाधव मोबाईल शॉपी नावाचे मोबाईलमध्ये गाणी भरून देण्याचे दुकान आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे, उपनिरीक्षक बापू खरात, अनिल हाडळ, पोलीस नाईक रुपेश गुरव आदी पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. चोरट्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करणे आता पोलिसांसमोरही आव्हान बनले आहे.