सेन्सेक्समध्ये 49 अंकांची तेजी ः बँकेच्या निर्देशांकाचा मजबुत आधार
वृत्तसंस्था/ मुंबई
मंगळवारी शेअरबाजारामध्ये चढउताराचा सामना पाहायला मिळाला. देशाचा अर्थसंकल्प आज रोजी मांडला जाणार असून गुंतवणूकदारांच्या सावधगिरीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शेअरबाजार सावरत अल्पशा तेजीसह बंद झाला आहे.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 49 अंकांनी वधारत 59549 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 13 अंकांच्या वाढीसह 17662 अंकांवर बंद झाला. बाजारात सुरुवातीला तेजी दिसली होती मात्र पहिल्या अर्ध्या सत्रामध्ये बाजारात दबाव निर्माण झाला. यातच सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी अनुक्रमे 59104, 17537 अंकांची निच्चांकी पातळी प्राप्त केली होती. पण दुसऱया सत्रामध्ये दोन्ही निर्देशांकांनी सकारात्मक कल दाखविला. आगामी काळामध्ये अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाकडे तसेच अर्थसंकल्पावर गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. हिंडनबर्ग यांच्या आरोपानंतर अदानी समूहाचे समभाग काहीसे सावरताना दिसले आहेत. अदानी एंटरप्रायझेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स आणि अदानी ग्रिन यांचे समभाग मंगळवारी 2 ते 3 टक्के वाढलेले होते.
महिंद्रा आणि महिंद्रा, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स आणि अदानी एंटरप्रायझेस यांचे समभाग शेअरबाजारात तेजीसह बंद झाले. दुसरीकडे बजाज फायनान्स, टीसीएस, टेक महिंद्रा, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि सन फार्मा यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. विविध क्षेत्रातील निर्देशांकाचा विचार करता ऊर्जा निर्देशांक, ऑटो निर्देशांक आणि धातू निर्देशांक यांनी साधारणपणे दीड टक्के पेक्षा अधिक तेजी राखली होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या निर्देशांकांनीदेखील दमदार कामगिरी करत बाजाराला मजबूत आधार दिला. मिडकॅप निर्देशांक 1.4 टक्के तर स्मॉल कॅप निर्देशांक 2.2 टक्के वाढताना दिसून आला. आरोग्य, माहिती तंत्रज्ञान आणि तेल व वायू संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्रीचा कल मंगळवारच्या सत्रामध्ये पाहायला मिळाला.