सेन्सेक्स 319 अंकांनी वधारत बंद, आयटी समभाग चमकले
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ातील पहिल्या दिवशी भारतीय शेअरबाजार जागतिक सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर वधारत बंद होताना दिसला. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अर्थात आयटी कंपन्यांचे समभाग भारतीय शेअरबाजाराला मजबूत आधार देताना दिसले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 319 अंक वाढत 60,941 अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांकदेखील 90 अंकांच्या तेजीसह 18,118 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 समभागांपैकी 21 तेजीसह तर 9 समभाग घसरणीसह बंद झाले. सोमवारच्या सत्रामध्ये सन फार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयशर मोटर्स, टेक महिंद्रा, युपीएल आणि बजाज ऑटो यांच्यासह निफ्टीतील 32 समभाग तेजीत होते. तर दुसरीकडे अल्ट्राटेक सिमेंट, ग्रेसिम, एनटीपीसी, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स आणि लार्सन अँड टुब्रो यांच्यासमवेत निफ्टीतील 18 समभाग घसरणीसह बंद झाले.
सोमवारच्या सत्रामध्ये निफ्टीतील 11 निर्देशांकांपैकी 9 निर्देशांकांत दमदार तेजी दिसली. यामध्ये आयटी निर्देशांक सर्वाधिक 1.88 टक्के इतका वधारलेला होता. बँक, ऑटो, वित्तसेवा, माध्यम, एफएमसीजी, फार्मा, सार्वजनिक बँकांचा निर्देशांक आणि खासगी बँकांचा निर्देशांक तेजीमध्ये होता. धातू आणि रिअल्टी क्षेत्राचे निर्देशांक मात्र घसरणीसह बंद झालेले पाहायला मिळाले.
मागच्या आठवडय़ात शुक्रवारी सेन्सेक्स 236 अंकांनी घसरत 60,621 अंकांवर तर निफ्टी ा80 अंकांनी घसरत 18,027 अंकांवर बंद झाला होता. जागतिक बाजारांमध्ये अमेरिकेतील बाजार तेजीमध्ये पाहायला मिळाला. दाऊजोन्स 330 अंकांनी आणि नॅसडॅक 288 अंकांनी तेजीत होते. युरोपियन बाजारदेखील तेजीचा कल दाखवत होता. आशियाई बाजारात निक्की, हँगसेंग, कोस्पी, सेट कॉम्पोझिट आणि शांघाय कॉम्पोझिट यांचे निर्देशांक तेजीत होते.