उगे – सांगे येथे घडलेला प्रकार, गुन्हा नोंद
प्रतिनिधी / सांगे
मालवाहतूक करणारे ट्रक फोडण्याचे प्रकार सांगेच्या उगे भागात वाढले असून बुधवारी सकाळी उगे येथील दगडाच्या खाणीवर माल आणण्यासाठी गेलेल्या ट्रकवर अज्ञातांकडून दगडफेक करण्याचा प्रकार घडून त्यात ट्रकाची तोडफोड झाली. या घटनेत ट्रकाची काच फुटून लागल्यामुळे ट्रकचालक केम्पण्णा हरिजन हा जखमी झाला आहे.
सांगे पोलिसांनी ट्रकमालक राजेश चौधरी यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. अवजड वाहनांवर दगडफेक करण्याचे प्रकार गेल्या बऱयाच महिन्यांपासून सुरू आहेत. खडीच्या वाहतुकीवरून नाराज काही घटकांकडून ट्रकचालकांना यापूर्वी धमकावण्यात आले होते. अनेक वेळा वाहनांवर दगडफेकही झालेली आहे, अशी माहिती चौधरी यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 च्या दरम्यान खडीचे दगड आणण्यासाठी गुडी-पारोडा येथून ट्रक उगे येथील डायगो परेरा यांच्या खाणीवर चालला होता. पण उगे येथे पोहोचताच दुचाकी घेऊन आलेल्या एका व्यक्तीने ट्रकाच्या दर्शनी भागावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दगड गाडीच्या दर्शनी आरशावर बसल्यामुळे आरसा फुटूत ट्रकाचे नुकसान झाले.
या प्रकारामुळे ट्रकमालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या हल्ल्याला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कठोर करवाई करवाई करावी अशी मागणी लोकांनी केली आहे. यापूर्वी उगेतील एका खाणीवर ट्रकांना आग लावण्याचे प्रकार घडले होते. अनेक वेळा रिव्हॉल्व्हर दाखवून ट्रकमालकांना घाबरविण्यात आलेले आहे. या सर्व घटनांसंदर्भात पोलीस स्थानकात तक्रारी नोंद झालेल्या आहेत, अशी माहिती चौधरी यांनी दिली.