रत्नागिरी / प्रतिनिधी
कोकण मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या 09149 क्रमांकाच्या कुडाळ-विश्वमैत्री एक्सप्रेस स्पेशलवर संतप्त प्रवाशांनी दगडफेक केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास माणगाव रेल्वे स्थानकात घडली.स्थानकात दाखल होणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांमध्ये चढण्यास जागाच न मिळाल्याने प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त चाकरमान्यांनी काही काळ रूळावरच ठिय्या मांडल्याने एक्सप्रेस अर्धा तास खोळंबली. दुसऱ्या स्पेशलमधून व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर प्रवाशी शांत झाले.
रोहा स्थानकात चिपळूण-रोहा मेमू अर्धा तास रोखली
कोकण मार्गावर प्रथमच चालवण्यात आलेली चिपळूण-रोहा मेमू स्पेशल रोहा येथे पोहचल्यानंतर पुढे रोहा-दिवापर्यंत चालवण्यात येते. मंगळवारी मेमू स्पेशल चिपळूण स्थानकातून तोबा गर्दीने धावल्याने पुढे याच स्पेशलमधून दिवापर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गर्दीमुळे रोहा येथील प्रवाशांना प्रवेशच मिळाला नाही. संतप्त 30 ते 40 प्रवाशांनी मेमू स्पेशलच्या पुढे जात अर्धा तास ही स्पेशल रोखून धरली. मागून येणाऱ्या स्पेशलमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतरच प्रवाशी रुळावरून बाजूला होताच स्पेशल दिवाच्या दिशेने मार्गस्थ झाली.