मनपाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष : वाहतूक काहीवेळ ठप्प
बेळगाव : बसवाण गल्ली-मारुती गल्ली अशा विविध परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही नळांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरी सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करूनदेखील पूर्तता केली नाही. त्यामुळे परिसरातील रहिवाशांसह व्यावसायिकांनी शुक्रवारी दुपारी रास्तारोको करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच शासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला. शहरातील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. पण नागरिकांच्या मागणीकडे महापालिका प्रशासनाने पाठ फिरविली असल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषत: बसवाण गल्ली तसेच देशपांडे गल्ली परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बसवाण गल्लीत औषध विक्रेत्यांची दुकाने तसेच गोडाऊन आहेत. त्यामुळे या रस्त्याशेजारी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. येथील रस्ता ठिकठिकाणी खराब झाला असून, औषध घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्ता खूपच खराब झाला आहे. ख•dयांमधून ये-जा करणे मुश्कील बनल्याने वृद्ध नागरिक पडत असल्याच्या घटना घडत आहेत. रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. पण कित्येक वर्षांपासून हा रस्ता विकासापासून वंचित आहे. त्याचप्रमाणे मारुती गल्लीतही काही ठिकाणी रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. नळांना दूषित पाणी येत असल्याने याबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. जलवाहिन्या फुटल्याने गटारीचे पाणी मिसळत असल्याचा संशय आहे. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी तक्रार नोंदवूनही दखल घेण्यात आली नाही. सध्या शहरातील विविध गल्ल्यांमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे देशपांडे गल्ली आणि मारुती गल्ली परिसरातील दूषित पाणीपुरवठ्याचे निवारण करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशा मागणीसाठी नागरिकांनी नरगुंदकर भावे चौक येथे रास्तारोको केला. अनेकवेळा मनपाकडे पाठपुरावा करूनही कानाडोळा केला आहे. अडचणींमध्ये आणखी किती दिवस रहायचे? असा मुद्दा उपस्थित करून नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. याप्रमाणे नागरिकांना रास्ता रोकोचे अस्त्र उगारावे लागले. अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. महापालिका प्रशासनाने या समस्यांचे निवारण करण्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच तातडीने विकासकामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. व्यावसायिक आणि रहिवाशांनी रास्तारोको करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मारुती गल्लीतील वाहतूक काहीवेळ ठप्प झाली. वाहनधारकांना अन्य मार्गांचा अवलंब करावा लागला.