गोवा फॉरवर्डच्या शिष्टमंडळाने घेतली एमपीएच्या अध्यक्षांची भेट
वास्को : गोवा फॉरवर्ड पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुरगावमध्ये एमपीएचे नुतन अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुरगाव बंदरातून होणारी कोळसा हाताळणी बंद करावी व त्याच्या जागी क्रूस पर्यटनाला संधी द्यावी अशी मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मुरगावमधील काही शॅक मालक, मच्छीमार तसेच समाजसेवक शंकर पोळजी व जयेश शेटगावकर उपस्थित होते. गोवा फॉरवर्डचे नेते दुर्गादास कामत यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या शिष्टमंडळाने एमपीएच्या अध्यक्षांना मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीमुळे मुरगाव तालुक्यातील जनतेला भेडसावणाऱ्या धुळी प्रदुषणाची सविस्तर माहिती दिली. प्रदुषण कशाप्रकारे होते व या प्रदुषणामुळे लोकांच्या आरोग्यावर कशाप्रकारे परीणाम होत आहे याबाबतही त्यांनी अध्यक्षांना माहिती दिली. त्यामुळे मुरगाव बंदरातून होणारी कोळसा हाताळणी बंद व्हावी अशी मागणी त्यांनी केली. ही हाताळणी पटकन बंद होणे शक्य नसल्याने टप्प्याटप्प्याने ती बंद करण्यात यावी. या माल हाताळणी ऐवजी हळुहळु बंदरात क्रूस पर्यटन वाढवावे. क्रूस पर्यटनाला देशात मागणी आहे. क्रूस जहाजांमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील. प्रदुषण आणि पर्यावरणाच्या नाशाचाही प्रश्न उपस्थित होणार नाही अशी माहिती शिष्टमंडळाने एमपीएच्या अध्यक्षांना दिली. आपण या समस्येत लक्ष घालून पाठपुरावा करेन असे आश्वासन अध्यक्षांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिष्टमंडळाने एमपीएशी संबंधीत अन्य विषयांवरही अध्यक्षांशी चर्चा केली. बायणा किनाऱ्यावरील शॅक मालकांना आधीच पर्यटन खात्याला प्रत्येकी दोन लाख रूपये भरावे लागत असताना एमपीएलाही 1 लाख 60 हजार रूपये भरण्याची सुचना करण्यात येत असल्याने शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली. हा प्रकार अन्यायकारक असल्याचे अध्यक्षांच्या नजरेस आणून देण्यात आले. एमपीएच्या कार्यक्षेत्राच्या प्रश्नावरही शिष्टमंडळाने अध्यक्षांकडे प्रश्न उपस्थित केले. यावेळी अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार यांना शिष्टमंडळाने मागण्या व समस्यांचे निवेदन सादर केले.