Tarun Bharat

ओमकार नगर हालगा येथे बस थांबवा

गैरसोय होत असल्याने हालगा ग्रामस्थांची परिवहनकडे मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

हालगा येथील ओमकार नगर (राईसमील) येथील बस थांब्यानजीक परिवहन मंडळाच्या बस थांबत नसल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, परिवहन मंडळाच्या बसला ओमकार नगर येथे थांबा द्यावा अशी मागणी हालगा ग्रामस्थांच्यावतीने बुधवारी परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

ओमकार नगर हा परिसर हालगा ग्राम पंचायतीच्या अखत्यारित येतो. हालगा गावाला परिवहन मंडळाची स्वतंत्र बस नसल्यामुळे बस्तवाड, मास्तमर्डी, तारिहाळ, चंदनहोसूर, केके कोप्प, हलगीमर्डी, बडाल अंकलगी, मरिकट्टी या गावच्या बसवर अवलंबून रहावे लागते. हालगा गावच्या हद्दीत येणाऱया ओमकार नगर येथे बस थांबविली जात नाही. हालगा गावात बस थांबविल्यानंतर थेट राष्ट्रीय महामार्गावरून अलारवाड येथील ब्रिजवरून बस खाली उतरविली जाते.

दखल घेण्याचे आश्वासन

सर्व्हीस रस्त्यावर विद्यार्थी व प्रवासी तासन्तास वाट पहात बसतात. यामुळे त्यांना शाळा व महाविद्यालयांमध्ये वेळेवर पोहोचण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे बसपास असतानाही खासगी वाहतुकीने बेळगाव गाठावे लागते. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. याची दखल घेत हालगा ग्रामस्थ व ग्रामपंचायत अध्यक्ष-सदस्यांतर्फे परिवहन मंडळाला निवेदन दिले. परिवहन मंडळाचे अधिकारी रविंद्र बुलबुले यांनी निवेदन स्वीकारून याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

स्वतंत्र बस सुरू करण्याची मागणी

हालगा गावासाठी स्वतंत्र बस सुरू करावी, यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सदानंद बिळगोजी, ग्राम पंचायत सदस्य सागर कामाण्णाचे, तवणाप्पा पायाक्का, भुजंग सालगुडे, विलास परिट, किरण हणमंताचे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

धूमस्टाईल, सायलेन्सर ब्लास्टवर कारवाईची गरज

Amit Kulkarni

पुतळा उभारण्यावरून पिरनवाडीत तणाव, सौम्य लाठीमार

Tousif Mujawar

हलगा-मच्छे बायपासची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Amit Kulkarni

वाघवडे येथे चोरटय़ांकडून 2 लाखांचे दागिने लंपास

Amit Kulkarni

झाडे पडून वीजपुरवठा झाला ठप्प

Patil_p

धावत्या रिक्षाने घेतला पेट

Patil_p