सेन्सेक्स 274 अंकांनी मजबूत ः इन्फोसिस, रिलायन्स तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मागील तीन दिवसांच्या घसरणीला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. बीएसई सेन्सेक्स 274 अंकांनी वधारुन मंगळवारच्या सत्रात मात्र तेजी प्राप्त करत बंद झाला आहे. मुख्य कंपन्यांमध्ये इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागातील लिलावामुळे बाजाराकडून तेजीची नोंद करण्यात आली आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 274.12 अंकांनी वधारुन निर्देशांक 61,418.96 वर बंद झाला आहे. मंगळवारच्या सत्रात काही काळ सेन्सेक्सने 321.79 अंकांचा उच्चांक गाठला होता. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 84.25 अंकांनी वधारुन निर्देशांक 18,244.20 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, एनटीपीसी, अल्aट्राटेक सिमेंट, टायटन, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग प्रामुख्याने लाभात राहिले होते. अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले, भारती एअरटेल, पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचे समभाग नुकसानीत राहिल्याचे दिसून आले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध घडामोडींमध्ये आशियातील बाजारात जपानचा निक्की आणि चीनचा शांघाय कम्पोझिट लाभात तर दक्षिण कोरियाचा कॉस्पी व हाँगकाँगचा हँगसेंग नुकसानीसह बंद झाले आहेत. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.67 टक्क्यांनी वधारुन 88.04 डॉलर प्रति बॅरेलवर बंद झाले आहे.
मंगळवारच्या कामगिरीमुळे गुंतवणूकदारांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला असून येणाऱया कालावधीमध्ये बाजारातील कामगिरी अजून मजबूत राहणार असल्याचे संकेत निर्माण होत आहेत. यासोबतच जागतिक पातळीवरील राजकीय व आर्थिक घटनांचाही परिणाम यावर दिसून येणार असल्याचे स्पष्टीकरण काही अभ्यासकांनी या दरम्यान दिले आहे.