मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
विविध कंपन्यांमध्ये गेली अनेक वर्षे औषध विक्री प्रतिनिधी म्हणून काम केलेल्या तरुणांना अचानकपणे नोकरीवरून कमी करण्यात येत आहे. विविध अटी लागू करून वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे जिल्हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
विविध औषध कंपन्यांमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अचानक पणे बदली करण्यात येत आहे. काम करण्याच्या वेळेमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. जीपीआरएस ट्रॅकर लावुन कर्मचार्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकूणच नाहक मानसिक त्रास देण्याचा प्रकार कंपन्यांकडून होत आहे. तेव्हा संबंधित कंपन्यांना सरकारने सक्त ताकीद करावी अशी मागणी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, सेक्रेटरी प्रसाद देसाई, खजिनदार सुजय पाटील, जॉईंट सेक्रेटरी मंगलदास मेस्ता, सदाशिव बापट कर्नाटक स्टेट मॅक्लॉइड अध्यक्ष सुधीर बिर्जे, विठ्ठल बाळेकुंद्री यांच्यासह वैद्यकीय प्रतिनिधी उपस्थित होते.