पुणे / प्रतिनिधी :
‘लोन ॲप’च्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कर्ज घेण्यास भाग पाडून नागरिकांचे अक्षरशः जगणे मुश्कील करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई केली आहे. सायबर गुन्हेगारांवर ‘मोका’नुसार झालेली ही पहिली कारवाई असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, या टोळीतील मुख्य आरोपीचे आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची माहिती पुढे आली असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.
मुख्य आरोपी व टोळी प्रमुख धीरज भारत पुणेकर (वय 36, रा. सोलापूर), स्वप्नील हनुमत नागटिळक ( वय 29, रा. विजापुर रोड, सोलापूर), श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड (वय 26, रा त्रिवेणीनगर भेकराईनगर फुरसुंगी, हडपसर), प्रमोद जेम्स रणसिंग (वय 43, रा. मुमताजनगर कुमठेनाका, सोलापूऱ), सॅम्युअल संपत कुमार (वय 40 , डिकोजा रोड बेलातुर बेंगळूर, कर्नाटक ), सय्यद अकिब पाशा ( वय 23, वर्षे रा. बेंगळूर, कर्नाटक ), मुबारक अफरोज बेग ( वय 22, रा.बेंगळूर, कर्नाटक), मुजीब बरांद कंदियल पिता इब्राहिम ( वय 42, रा. कोझीकोड, अरुर केरळ ), मोहम्मद मनियत पिता मोहिदु (वय 32, रा. पडघरा, केरळ) अशी ‘मोका’ नुसार कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
अधिक वाचा : देशात 2026 पासून धावणार बुलेट ट्रेन
संबंधित आरोपींनी संघटित गुन्हेगारी करून आर्थिक फायदा देण्याचे आमिष दाखवित हजारो नागरिकांची फसवणूक केली. पुणेकर व त्याच्या टोळीतील इतर आठ साथीदार यांच्या आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन
‘लोन ॲप’द्वारे लोकांना त्रास देण्याचे प्रकार काही वर्षांपासून सुरू होते. त्यामुळे दोन जणांनी आत्महत्या केल्या, तर एक खुनाची घटना देखील घडली. या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांनी कारवाई करून हे सर्व प्रकरण उघडकीस आणले. त्याच बरोबर हे प्रकरण महाराष्ट्रासह देशभरातील लोकांना फसवित असल्याचे उघड झाले, त्यांचे धागेदोरे अन्य देशांतही आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. त्यादृष्टीने संबंधित टोळी विरुद्ध कडक कारवाई केली आहे. तसेच सायबर गुन्ह्यात पहिल्यांदाच ‘मोका’नुसार कारवाई केली आहे, असे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.