Tarun Bharat

भारतीय नौदलाचं सामर्थ्य… विमानवाहू नौका !

भारत ज्या पट्टय़ात विसावलाय तो हिंदी महासागर अन् कांगावखोर शेजारी चीनच्या वाढत्या ताकदीचा धोका विचारात घेता आपलं नौदल सदोदित अत्यंत समर्थ नि सुसज्ज असणं हे महत्त्वाचं…अन् कुठल्याही नौदलाला प्रचंड बळकट, घातक बनवते ती विमानवाहू नौका. ही क्षमता पदरी असलेल्या निवडक राष्ट्रांमध्ये भारताचा साठच्या दशकापासून समावेश राहिलाय…सध्या ही ताकद कुठवर पोहोचलीय, ती किती वाढण्याची गरज आहे नि ‘एअरक्राफ्ट कॅरियर’चं महत्त्व काय यावर थोडक्यात टाकलेला दृष्टिक्षेप…

विमानवाहू नौका…कुठल्याही देशाच्या नौदलाचं फार मोठं सामर्थ्य…त्या दोन शब्दांत असलेल्या ताकदीशी इतर बऱयाचशा संरक्षण साधनांची तुलना करणं अक्षरशः कठीण. विश्वातील कुठल्याही अथांग महासागरावर वर्चस्व गाजविणं हा विमानवाहू नौकेचा डाव्या हाताचा खेळ…विमानवाहू नौकेसह हातात हात घालून चालणारा ‘कॅरियर बॅटल-ग्रुप’ (सीबीजी) म्हणजे तर घातकतेचं, शत्रूच्या विनाशाचं दुसरं नाव. कारण त्यात समावेश असतो तो ‘पूझर्स’, विनाशिका, ‘फ्रिगेट्स’, ‘कॉर्व्हेट्स’, ‘टँकर्स’ आणि पाणबुडय़ांचा सुद्धा…आधुनिक काळातील ‘सीबीजी’चं वर्णन ‘इनव्हिन्सिबल’ असं केल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. खेरीज प्रतिस्पर्ध्याचे तीन तेरा वाजविण्यासाठी विमानवाहू नौकेवर फायटर जेट्स, क्षेपणास्त्रं अन् हेलिकॉप्टर्स यांचा ताफा 24 तास सज्ज असतो…

‘विक्रांत’चा स्वदेशी अवतार…

भारतानं काही महिन्यांपूर्वी 45 हजार टनांची, स्वदेशात निर्मिती केलेली, सुमारे 20 हजार कोटी रुपयांची वा 2.5 अब्ज डॉलर्सची विमानवाहू नौका ‘आयएनएस विक्रांत’चं दर्शन साऱया विश्वाला घडवलंय नि आपला दबदबा जास्तच वाढलाय. (त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलंही लढाऊ विमान वा शस्त्रं नाहीत. त्यासाठी वेगळे डॉलर्स ओतावे लागतील…या नौकेवर नुकतीच भारतात बनविलेलं ‘लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ व रशियानिर्मिती ‘मिग-29 के’ यांची यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आलीय)…30 फायटर्स आणि हेलिकॉप्टर्ससह यंदाचं वर्ष संपण्यापूर्वी शत्रूचा समाचार घेण्यासाठी ती सज्ज होईल. ‘आयएनएस विक्रांत’वर इस्रायली बनावटीची ‘बराक-8 मिसाईल डिफेन्स सिस्टम’ तैनात केली जाणार असून तिला साथ मिळेल ती ‘मारिच टॉर्पेडो डिफेन्स सिस्टम’ अन् ‘कवच अँटी-मिसाईल सिस्टम’ची. शिवाय पाण्यातील शत्रूचा वेध घेण्यासाठी ‘सोनार’ व्यवस्था देखील हाताशी असेल. विविध प्रकारच्या ‘गन्स’ना साथ लाभेल ती ‘मिग-29 के मल्टी-रोल फायटर जेट्स’ नि ‘कामोव्ह-31’, ‘एमएच 60-रोमिओ’, ‘सी-किंग’सारख्या ‘डेडली’ हेलिकॉप्टर्सची…

गरज तीन विमानवाहू नौकांची…

गेल्या दोन वर्षांपासून भारताच्या मुठीत कुठलीही विमानवाहू नौका नव्हती. कारण रशियाकडून 2.33 अब्ज डॉलर्सना विकत घेतलेल्या ‘आयएनएस विक्रमादित्य’चं देखभालीचं व दुरुस्तीचं काम नेटानं चाललं होतं…विश्लेषकांच्या मतानुसार, देशाला गरज आहे ती किमान तीन विमानवाहू नौकांची. कारण एकाचं देखभालीचं काम चालू असल्यास इतर दोन नौका पूर्व आणि पश्चिम समुद्रातील आव्हानांवर नजर ठेवू शकतात…‘आयएनएस विक्रांत’ बांधण्यासाठी सरकारनं परवानगी दिली होती ती जानेवारी, 2003 मध्ये. त्यानंतर तब्बल 20 वर्षांचा काळ उलटून गेला अन् ती पाण्यात उतरण्यासाठी सज्ज झाली. हे उदाहरण आपल्या वेळापत्रकासंबंधी बऱयाचशा गोष्टी सांगून जाणारं…

भारतानं 2 अब्ज डॉलर्सच्या साहाय्यानं 45 ‘मिग-29 के’ची ‘आयएनएस विक्रमादित्य’ व ‘आयएनएस विक्रांत’ यांच्यासाठी खरेदी केलीय (त्यापैकी 40 शिल्लक राहिलीत). परंतु रशियन साहित्य म्हणजे प्रश्न निर्माण होतो तो त्यांच्या देखभालीचा व सुटय़ा भागांचा. आता त्यावर उत्तर शोधण्यात आलंय ते 26 नवीन जेट्सची भविष्यात खरेदी करण्याचं ठरवून अन् त्यासाठी झुंज चाललीय ती फ्रान्सचं ‘राफेल-एम’ (काही महिन्यांपूर्वी गोव्यात ‘आयएनएस हंसा’वर घेतलेल्या चाचणीत या प्रेंच विमानानं अमेरिकच्या ‘सुपर हॉर्नेट’वर मात केली होती) व अमेरिकेचं ‘एफ/ए-18’ यांच्यात. कारण भारताचं स्वदेशात निर्मिती केलेलं ‘ट्विन-इंजिन डेक बेज्ड फायटर’ तयार होणार ते किमान दहा वर्षांनी…

चीनचा धोका…

चीननं ‘लायोनिंग’ व ‘शानडाँग’ यांना यापूर्वीच पाण्याचं दर्शन घडवलंय, तर तिसरी विमानवाहू नौका तब्बल 80 हजार टनांची ‘फुजियान’ दोन महिन्यांपासून चाचण्यांना तोंड देतेय. शिवाय ‘ड्रगन’ चौथी विमानवाहू नौका सुद्धा बांधतोय. चीनच्या नौदलात 355 नौका व पाणबुडय़ांचा समावेश असून ते विश्वातील सव<ा&ंत मोठं मानण्यात येतंय…या बाबींचा विचार केल्यास हिंदी महासागर क्षेत्रातील भारताचं वर्चस्व कमी करण्यास राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगच्या देशाला भविष्यात फारसा वेळ लागणार नाहीये. तथापि, या पट्टय़ात अजूनही बीजिंगचे व्यापाराचे महत्त्वाचे मार्ग व इंधनाचे टँकर्स यांना अडविण्याची शक्ती आपल्याजवळ आहे…

विमानवाहू नौकांचे फायदे…

अनेक विश्लेषक विमानवाहू नौकांचं वर्णन ‘सिटिंग डक्स’ असं करतात आणि त्यांना वाटतंय की, अंदमान आणि निकोबार नि लक्षद्वीप या बेटांना हवाई तळ म्हणून सज्ज करावं. पण कित्येकांच्या मते, ही सूचना योग्य नाही, कारण जमिनीवरून हवेत झेपावणाऱया ‘फायटर्स’च्या तुलनेत विमानवाहू नौकेवरून उड्डाण करणारी लढाऊ विमानं नौदलाला जास्त उपयुक्त ठरतात. त्यांच्यामुळं ‘एअर डिफेन्स ऑपरेशन्स’, ‘अँटी-सबमरिन’, ‘अँटी-शिप वॉरफेअर’ यांच्याविरुद्धच्या मोहिमेला लवचिकता प्राप्त होते. उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अमेरिकेजवळ 11 विमानवाहू नौका असून प्रत्येकाची क्षमता जवळपास 1 लाख टन नि त्यांच्यावर सज्ज 80 ते 90 लढाऊ विमानं. इराक, आखाती युद्ध, अफगाणिस्तानातील संघर्षावेळी अमेरिकेच्या भूदलानं तिथं पाऊल ठेवण्यापूर्वी साऱया परिस्थितीवर नियंत्रण मिळविलं ते जगभर पसरलेल्या महासत्तेच्या विमानवाहू नौकांनीच…

मागं वळून पाहताना…

‘आयएनएस विक्रांत’…भारताची पहिली विमानवाहू नौका

1957 मध्ये ब्रिटनकडून खरेदी केलेली अन् 4 नोव्हेंबर, 1961 रोजी भारतातर्फे कार्यान्वित झालेली 19 हजार 500 टन क्षमतेची ‘आयएनएस विक्रांत’ ही आशियाई देशांतील पहिली विमानवाहू नौका अन् हा मान दीर्घकाळ तिच्याकडे राहिला…1961 साली गोवा मुक्तीच्या मोहिमेदरम्यान तैनात करण्यात आलेल्या ‘विक्रांत’नं खरी जबरदस्त भूमिका बजावली ती 1971 च्या युद्धावेळी. या नौकेनं पूर्व पाकिस्तानची संपूर्ण नाकेबंदी करण्याबरोबरच पाकिस्तानी सैन्याला समुद्रातून रोखण्यात मोलाचा वाटा उचलला…‘विक्रांत’ अत्याधुनिक ‘सी हॅरियर’ विमानांसह 1984 मध्ये ‘व्हर्टिकल/शॉर्ट टेक ऑफ अँड लँड कॅरियर’ म्हणून नवीन अवतारात दाखल झाली. पुढं ‘विक्रमादित्य’च्या समावेशाला आणि त्याला नवीन रूप देण्याच्या योजनेला चालना मिळाली ती यातूनच…36 वर्षं सेवा दिल्यानंतर ‘आयएनएस विक्रांत’ 31 जानेवारी, 1997 रोजी निवृत्त झाली अन् 2014-15 मध्ये ती भंगारात काढण्यात आली…

‘आयएनएस विराट’…1987 ते 2017

‘आयएनएस विराट’ला पहिल्यांदा पाण्यात उतरविलं गेलं ते ‘एचएमएस हर्मिज’ या नावानं ‘ब्रिटिश रॉयल’नं 1959 साली. त्यावेळची ती ‘रॉयल नेव्ही’ची ‘फ्लॅगशिप’ अन् तिनं 1982 सालच्या अर्जेन्टिनाविरुद्धच्या ‘फॉकलँड्स’ युद्धात पराक्रम गाजविला होता…1985 साली निवृत्त झाल्यानंतर त्या ‘सेंटॉर क्लास’ नौकेला भारतानं विकत घेतलं आणि तिला ‘रीफिट’ करून 1987 मध्ये आपल्या ताफ्यात दाखल करण्यात आलं. 28 हजार 700 टन क्षमतेच्या ‘विराट’नं भारतीय नौदलाची तब्बल 30 वर्षं सेवा केली…

‘आयएनएस विक्रमादित्य’…2013 पासून सेवेत

भारतीय नौदलानं ‘किएव’ वर्गातील ही विमानवाहू नौका 16 नोव्हेंबर, 2013 या दिवशी कार्यान्वित केली…तिनं सर्वप्रथम पाण्याला स्पर्श केला होता तो 80 च्या दशकाच्या सुरुवातीला अन् तिचं नाव होतं ‘बाकू’. तत्कालीन सेविएत युनियनच्या नौदलाची तिनं 1987 ते 1991 पर्यंत सेवा केली. सोविएत लयास गेल्यानंतर रशियानं तिचं नामकरण ‘ऍडमिरल गॉर्शकोव्ह’ असं केलं नि ती चार वर्षं कार्यरत राहिली…1996 साली निवृत्त झाल्यानंतर भारतानं 44 हजार 500 टन क्षमतेच्या व 284 मीटर्स लांबीच्या त्या विमानवाहू नौकेचं अधिग्रहण करून तिचं नाव ‘आयएनएस विक्रमादित्य’ असं ठेवलं…

अमेरिका, चीन, भारत यांच्या प्रमुख विमानवाहू नौकांची तुलना

वैशिष्टय़जेराल्ड फोर्ड (अमेरिका)फुजियान (चीन)आयएनएस विक्रांत (भारत)
लांबी337 मीटर्स316 मीटर्स262 मीटर्स
रूंदी78 मीटर्स76 मीटर्स62 मीटर्स
कार्यान्वितमे, 2017जून, 20222 सप्टेंबर, 2022
क्षमता1 लाख टन80 हजार टन45 हजार टन
विमानं7540 हून अधिक30
कर्मचारी4539माहिती उपलब्ध नाही2000
यंत्रणाअणुशक्तीवरस्टीम टर्बाईन्सगॅस टर्बाईन्स

जगातील सर्वांत मोठय़ा विमानवाहू नौका (टनांच्या दृष्टीनं)

नौकेचं नावटन
जेराल्ड फोर्ड (अमेरिका)1 लाख टन
निमित्झ (अमेरिका)97 हजार टन
फुजियान (चीन)80 हजार टन
शानडाँग (चीन)70 हजार टन
क्वीन एलिझाबेथ (ब्रिटन)65 हजार टन
ऍडमिरल कुझनेत्सोव्ह (रशिया)58 हजार 500 टन
लायोनिंग (चीन)58 हजार टन
विक्रमादित्य (भारत)45 हजार 400 टन
आयएनएस विक्रांत (भारत)45 हजार टन
चार्ल्स दि गॉल (फ्रान्स)42 हजार टन

विमानवाहू नौका असलेले देश…

देशनौकांची संख्या
अमेरिका11
चीन3
इटली2
ब्रिटन2
भारत2
फ्रान्स1
रशिया1
स्पेन1

संकलन ः राजू प्रभू

Related Stories

पुण्यातील 51 गणेश मंडळांचा ‘विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ’

Tousif Mujawar

दगडूशेठ दत्तमंदिराचे थ्री डी दर्शन घेण्याची सोय

prashant_c

शिवजयंतीला यंदा ८५ स्वराज्यरथांची मानवंदना

tarunbharat

कोकणच्या सुनबाई ‘मेडि क्वीन’

prashant_c

भारतातील पहिले डार्क स्काय रिझर्व्ह

Patil_p

सैनिकांच्या पोलादी मनगटांकरीता पुणेकरांनी पाठविले राखीचे प्रेमबंधन

Tousif Mujawar