देशाला आज मिळणार पहिली लस ः सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाकडून विकसित
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सर्व्हायकल कॅन्सरच्या (गर्भाशय मुखाचा कर्करोग) विरोधातील लढाईसाठी भारताला पहिली स्वदेशी लस मिळणार आहे. 1 सप्टेंबर म्हणजेच गुरुवारी सर्व्हायकल कॅन्सरच्या विरोधातील पहिली स्वदेशी लस सादर करण्यात येणार आहे. या लसीची निर्मिती सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने केली आहे.
सर्व्हायकल कॅन्सरच्या विरोधात भारताच्या पहिल्या क्वॉड्रिव्हेलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस व्हॅक्सीनला (क्यूएचपीव्ही) मार्केट ऑथरायझेशनसाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) अलीकडेच मंजुरी दिली होती. एचपीव्ही व्हॅक्सिनचा उद्देश महिलांना सर्व्हायकल कॅन्सरपासून वाचविणे आहे. सर्व्हायकल कॅन्सरमुळे देशात दर 8 मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होत असतो. या आजाराचे लवकर निदान झाले तरच तो रोखता येतो.
सध्या जगभरात सर्व्हायकल कॅन्सरच्या दोन व्हॅक्सिन आहेत. यातील पहिली क्वॉड्रिव्हेलेंट तर दुसरी बायव्हेलेंट व्हॅक्सिन आहे. सिरमने तयार केलेली व्हॅक्सिन ही हेपेटायटिस बी व्हॅक्सिनप्रमाणेच व्हीएलपीवर आधारित आहे. ही लस उपलब्ध झाल्यावर सर्व्हायकल कॅन्सरला रोखण्यास मदत होणार असून यामुळे होणारे मृत्यूंचे प्रमाण कमी करता येणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
नव्या लसीची किंमत
सध्या भारतात जागतिक स्तरावर परवानाप्राप्त दोन व्हॅक्सिन उपलब्ध आहेत. यातील क्वॉड्रिव्हेलेंट लसीची किंमत 2,800 रुपये प्रतिडोस आहे. तर बायव्हेलेंट लसीची किंमत 3,299 रुपये प्रतिडोस आहे. सिरमने तयार केलेली व्हॅक्सिन एचपीव्ही व्हायरसच्या एल1 प्रोटीन विरोधात अँटीबॉडी निर्माण करत सुरक्षा प्रदान करते. सध्या याच्या किमतीबद्दल कुठलीच माहिती समोर आलेली नाही.
भारतात रुग्णांचे प्रमाण अधिक
जगभरात सव्हार्यकल कॅन्सर हे 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये कॅन्सरमुळे होणाऱया मृत्युंमागे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात सर्व्हायकल कॅन्सरचे दरवर्षी 1.23 लाख रुग्ण आढळून येतात. यातील सुमारे 67,000 महिलांचा मृत्यू होतो. सर्व्हायकल कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येप्रकरणी भारत पाचव्या क्रमांकावर आहे.
लक्षणांबद्दल नसते माहिती
सर्व्हायकल कॅन्सर ह्युमन पॅपिलोमाव्हायरसमुळे होतो. हा विषाणू दीर्घकाळापर्यंत शरीरात राहतो आणि नंतर सर्व्हायकल कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतो. परंतु ज्या महिलांमध्ये रोगप्रतिकारक्षमता उत्तम असते, त्यांच्या शरीरात तो टिकाव धरू शकत नाही. परंतु एचआयव्ही किंवा अन्य गंभीर आजाराने पीडित महिलांना हा कॅन्सर होण्याची भीती असते. या कॅन्सरचे बहुतांश रुग्ण ऍडव्हान्स स्टेजमध्ये समोर येतात. सर्व्हायकल कॅन्सरच्या लक्षणांबद्दल माहिती नसणे आणि या आजाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हे घडत आहे.