प्रतिनिधी /मडगाव
मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱया वाहन चालकांविरुद्ध आता वाहतूक पोलीस कडक कारवाई करणार असल्याचे संकेत दक्षिण गोवा वाहतूक पोलीस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी सांगितले.
सोमवारी मडगावात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत श्री. आंगले यांनी ही माहिती दिली. गोव्यात ज्या गतीने रस्ता अपघातात माणसे मृत्यूमुखी पडत आहेत ते प्रमाण देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेने भयंकर आहे आणि त्यावर नियंत्रण घालण्यासाठीच पोलीस खात्याने आता कंबर कसलेली आहे.
मोटर वाहन कायद्याच्या 185 कलमाखाली आता मद्य सेवन करुन वाहन चालविणाऱया वाहन चालकांविरुद्ध कडक कारवाई करणार असून ही कारवाई दक्षिण गोव्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात दिवसरात्र कारवाई केली जाईल.
अति वेगाने वाहने चालविणाऱयाविरुद्धही ही कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या नजरेला असेही आढळून आलेले आहे की कैकदा अल्पवयीन मुले अतिवेगाने वाहने चालवत असतात किंवा मद्य सेवन करुन वाहने चालवत असता. अशावेळी या अल्पवयीन मुलांच्या पालकांना बोलावून पालकांवर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे, श्री आंगले यांनी स्पष्ट केले.
आपल्याला न सांगता आपल्या मुलाने वाहन नेले अशा प्रकारची कारणे अनेकदा पालक देत असतात. मात्र वाहन पालकांच्या नावावर असल्यामुळे वाहनासंबंधी अल्पवयीन मुलाने वाहन बाहेर नेले तरी त्याला पालकच जबाबदार ठरणार आणि हे सर्व कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्यात येणार आणि आज मंगळवारपासून याची कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे श्री. आंगले यांनी यावेळी सांगितले.