वृत्तसंस्था/ कराची
यजमान पाक आणि न्यूझीलंड यांच्यातील येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत बुधवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 6 बाद 440 धावा जमवत पाकवर दोन धावांची नाममात्र आघाडी मिळवली आहे. तत्पुर्वी पाकचा पहिला 438 धावावर संपुष्टात आला होता. न्यूझीलंडतर्फे टॉम लॅथम आणि कर्णधार केन विल्यम्सन यांनी दमदार शतके झळकवली. कॉनवेचे शतक 8 धावांनी हुकले.


या कसोटीत न्यूझीलंडने बिनबाद 165 या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. लॅथम आणि कॉनवे यांनी सलामीच्या गडय़ासाठी 183 धावंची भागीदारी केली. नौमन अलीने कॉनवेला पायचित केले. त्याने 14 चौकारासह 92 धावा झळकवल्या. कॉनवे बाद झाल्यानंतर लॅथम आणि कर्णधार विल्यम्सन या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 46 धावांची भर घातली. अब्रार अहमदने लॅथमला बदली खेळाडू गुलामकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 191 चेंडूत 10 चौकारासह 113 धावा जमवल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला निकोल्स नौमन अलीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 3 चौकारासह 22 धावा जमवल्या. विल्यम्सन आणि मिचेल यंनी चौथ्या गडय़ासाठी 65 धावांची भर घातली. अब्रार अहमदने मिचेलला झेलबाद केले. त्याने 47 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 42 धावा जमवल्या. कर्णधार विल्यम्सनला ब्लंडेलकडून बऱयापैकी साथ मिळाली. या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 90 धावांची भगीदारी केली. मोहमद वासीमने ब्लंडेलला पायचित केले. त्याने 1 षटकार आणि 3 चौकारासह 47 धावा जमवल्या. अब्रार अहमदने ब्रेसवेलला 5 धावावर बाद केले. कर्णधार विल्यम्सनने आपले शानदार शतक झळकवले. दिवसअखेर विल्यम्सन 11 चौकारासह 105 तर सोधी एका धावेवर खेळत आहे. पाकतर्फे अब्रार अहमदने 3, नौमन अलीने 2 तर मोहमद वासीमने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः पाक प. डाव 130.5 षटकात सर्वबाद 438, न्यूझीलंड प. डाव 136 षटकात 6 बाद 440 (विल्यम्सन खेळत आहे 105, लॅथम 113, कॉनवे 92, मिचेल 42, निकोल्स 22, ब्लंडेल 47, ब्रेसवेल 5, सोधी खेळत आहे 1, अब्रार अहमद 3-143, नौमन अली 2-137, मोहमद वासीम 1-81).