वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये सोमवार, 18 डिसेंबरला भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 5.5 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार दुपारी 3.48 वाजता झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू कारगिलमध्ये 10 किलोमीटर भूगर्भात होता. त्याचे धक्के काश्मीरमध्येही जाणवले. मोठ्या तीव्रतेच्या भूकंपानंतर आणखीही छोटे धक्के बसल्याचे सांगण्यात आले. लडाखमध्ये दुपारी 4.01 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता 3.8 इतकी मोजली गेली. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दुपारी 4.01 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 मोजली गेली. त्यानंतर दुपारी 4.18 वाजता किश्तवाडमध्ये आणखी एक भूकंप झाला. त्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल होती. याआधी, सकाळी 11.38 वाजता पाकिस्तानमध्ये 4.0 तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.