Tarun Bharat

सख्खे शेजारी आज पक्के वैरी!

राजस्थान-गुजरात आज आयपीएल जेतेपदासाठी आमनेसामने

अहमदाबाद / वृत्तसंस्था

देशाच्या नकाशात पक्के शेजारी असणारे राजस्थान-गुजरातचे संघ आज (रविवार दि. 29) आयपीएल फायनल लढतीच्या निमित्ताने एकमेकांचे ‘पक्के वैरी’ असणार आहेत. यंदाच्या आयपीएल जेतेपदावर ‘टायटन्स’ची मोहोर उमटणार की ‘रॉयल्स’ची, हे या माध्यमातून स्पष्ट होईल. रात्री 8 वाजता या निर्णायक सामन्याला प्रारंभ होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी यंदाच्या आयपीएल हंगामाला सुरुवात झाली, त्यावेळी यंदाच्या फायनल लढतीत हार्दिक पंडय़ा व संजू सॅमसन हे कर्णधार नाणेफेकीसाठी उतरतील, असे सांगितले असते तर ते आश्चर्याचे ठरले असते. पण, आज  लढतीत पंडय़ा-सॅमसनच आमनेसामने उभे ठाकत आहेत.

आजच्या लढतीच्या माध्यमातून एकीकडे, गुजरात टायटन्सचा संघ आपल्या स्वप्नवत हंगामाची जेतेपदाने सांगता करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल तर दुसरीकडे, 14 वर्षांनंतर प्रथमच फायनलमध्ये धडक मारणारा राजस्थानचा संघ जेतेपद मिळवून आपला पहिला कर्णधार शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

डेव्हिड मिलर, राहुल तेवातियासारखे दुसऱया फळीतील खेळाडूंवर अधिक अवलंबून असलेल्या गुजरात टायटन्सचा संघ यंदा फायनलमध्ये धडक मारण्याचा पराक्रम गाजवण्यात यशस्वी ठरला असून आता जेतेपद मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न असतील. तंदुरुस्तीनंतर जोरदार पुनरागमन करणाऱया हार्दिक पंडय़ाने नेतृत्वात उत्तम ठसा उमटवला असून आजच्या लढतीत हे त्यांचे बलस्थान ठरु शकते.

5 वर्षांनंतर प्रथमच बहरात परतलेल्या डेव्हिड मिलरच्या कारकिर्दीला देखील या निमित्ताने संजीवनी लाभली आहे. राहुल द्रविडकडून खडे बोल ऐकल्यानंतर वृद्धिमान साहाने क्रिकेट सिरियसली घेण्यास सुरुवात केली असून याचे प्रतिबिंब त्याच्या कामगिरीतून उमटत राहिले आहे.

वास्तविक, पार्थिव पटेल किंवा भारताचा सर्वात लक्षवेधी जलद गोलंदाज जसप्रित बुमराहचा अपवाद वगळता गुजरात राज्य क्रीडा क्षेत्रात दिग्गज खेळाडू घडवण्यासाठी फारसे ओळखले जात नाही. पण, ज्याप्रमाणे चेन्नईची आयपीएलमध्ये एन्ट्री झाल्यानंतर तामिळनाडू प्रकाशझोतात आले, त्याचप्रमाणे गुजरातने लक्ष वेधून घेतले आहे. गुजरातचा संघ घरच्या मैदानावर खेळणार असून याचा त्यांना लाभ घेता येणार का, हे आज स्पष्ट होईल.

800 पेक्षा अधिक धावांची आतषबाजी करणारा बटलर आणि लॉकी फर्ग्युसन-यश दयाल यांच्यात जुगलबंदी रंगणार का, याची आज उत्सुकता असेल. याशिवाय, शुभमन गिल या बडय़ा लढतीत आपला वरचष्मा गाजवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहे. संघाला प्रथम गोलंदाजीची संधी मिळाली तर याचे सोने करण्याचे प्रसिद्ध कृष्णाचे प्रयत्न असतील. पण, डेव्हिड मिलरला रोखण्यात तो यशस्वी होणार का, याची सर्वाधिक उत्सुकता असेल.

चहल-अश्विनच्या वैविध्याविरुद्ध हार्दिकची रणनीती काय असेल, तसेच रशिद खानविरुद्ध बटलर साहसी फटके मारण्यासाठी पुढाकार घेणार का, हे देखील या लढतीत स्पष्ट होईल. आज एक संघ हिरो ठरेल व एका संघाची निराशा होईल. पण, आयपीएलची ही लढत प्रदीर्घकाळ संस्मरणात राहण्यासारखी झाली तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल, असे सध्याचे संकेत आहेत.

संभाव्य संघ

गुजरात टायटन्स ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, गुरकिरत सिंग, बी. साई सुदर्शन, शुभमन गिल, राहुल तेवातिया, विजय शंकर, मॅथ्यू वेड, रहमनुल्लाह गुरबाझ, वृद्धिमान साहा, अल्झारी जोसेफ, दर्शन नळकांडे, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी, नूर अहमद, प्रदीप संगवान, रशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, वरुण ऍरॉन, यश दयाल.

राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेतमेयर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेड मकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गरवाल, जेम्स नीशम, नॅथन कोल्टर-नाईल, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, डॅरेल मिशेल, कॉर्बिन बॉश.

सामन्याची वेळ ः रात्री 8 वा.

फलंदाजीत सातत्य नसले तरी सॅमसनचे नेतृत्व प्रगल्भतेकडे!

आतापर्यंत 20 आंतरराष्ट्रीय सामनेही न खेळलेल्या संजू सॅमसनला फारसे फॅन फॉलोईंग नाही. पण, या हंगामात त्याने संघाला अंतिम फेरीत मारुन दिलेली धडक स्पृहणीय ठरली आहे. एरवी फलंदाजीतही तो फारसा आश्वासक नाही. एखादा उत्तुंग षटकार खेचल्यानंतर दुसऱयाच चेंडूवर विश्वास बसणार नाही, असा खराब फटका खेळून तो विकेट बहाल करुन निघून जातो, असे अधोरेखित होत आले आहे. पण, कर्णधार म्हणून त्याने आपली प्रगल्भता दाखवून दिली आहे.

तसे पाहता, रविचंद्रन अश्विन, यजुवेंद्र चहल, जोस बटलर, ट्रेंट बोल्टसारख्या बोनाफाईड स्टार्ससह यशस्वी जैस्वाल किंवा प्रसिद्ध कृष्णासारख्या यंग गन्सना हाताळणे सोपे नव्हते. पण, संजूने यात कमालीचे यश प्राप्त केले आहे.

चार वेळा आयपीएल फायनल खेळणारा हार्दिक पंडय़ा प्रत्येक वेळी विजयी!

हार्दिक पंडय़ाने आजवर 4 वेळा आयपीएल फायनल खेळली असून या प्रत्येक वेळी त्याचा संघच विजयी ठरत आला आहे. यंदा हार्दिक पंडय़ाकडे गुजरातच्या नेतृत्वाची धुरा असून आता कर्णधार नात्याने विजय संपादन करुन देण्याचे त्याचे लक्ष्य असेल.

हार्दिक पंडय़ा यापूर्वी मुंबई इंडियन्स संघात समाविष्ट होता. मुंबई इंडियन्स संघाने 2015, 2017, 2019 व 2020 मध्ये आयपीएल स्पर्धा जिंकली, त्यावेळी पंडय़ा त्या संघात समाविष्ट होता. आयपीएल फायनलमध्ये पोहोचल्यानंतर प्रत्येक वेळी विजय संपादन करुन देण्याची कामगिरी कायम राखण्यात तो यंदाही यशस्वी ठरणार का, हे आजच्या लढतीत सुस्पष्ट होईल.

जोस बटलरची विराटच्या विक्रमाशी बरोबरी

राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने दुसऱया क्वॉलिफायर लढतीत शतक झळकावत आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतकांच्या विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याने हा पराक्रम गाजवला. विराट कोहलीच्या खात्यावर आयपीएलमध्ये 5 शतके बटलरने यंदा एकाच हंगामात 4 शतके फटकावली आहेत. सर्वाधिक शतकांचा विक्रम ख्रिस गेलच्या खात्यावर असून त्याने 6 शतके केली आहेत.

वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानचे ते जेतेपद आणि चॅपेलची बोलकी प्रतिक्रिया!

शेन वॉर्न हा राजस्थान रॉयल्सचा पहिला कर्णधार. 2008 मध्ये आयपीएल स्पर्धेतील उद्घाटनाच्या हंगामात शेन वॉर्नने रविंद्र जडेजा, दिनेश साळुंखे, स्वप्नील अस्नोडकर व नीरज पटेल अशा खेळाडूंची मोट बांधून रोमांचक जेतेपद मिळवून दिले, त्यावेळी इयान चॅपेलची प्रतिक्रिया खूप बोलकी होती. चॅपेल त्यावेळी म्हणाला होता, ‘वॉर्न हा कधीही ऑस्ट्रेलियाच्या वाटय़ाला न आलेला सर्वोत्तम कर्णधार’!

आता प्रदीर्घ कालावधीनंतर राजस्थान रॉयल्सचा संघ पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचला. पण, हे पाहण्यासाठी वॉर्न हयात नाही. साहजिकच, यंदा जेतेपद संपादन करुन वॉर्नला श्रद्धांजली वाहण्याचे राजस्थानचे प्रयत्न असणार आहेत.

सेहवाग म्हणतो, यंदा पाहिलेला विराट खूप वेगळा!

आपल्या 14 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केल्या नसतील, इतक्या चुका विराटने यंदाच्या फक्त एका आयपीएल हंगामात केल्या आहेत. या हंगामात आपण पाहिलेला विराट खूप वेगळा आहे, असे मत विरेंद्र सेहवागने मांडले.

अडीच वर्षांपूर्वी शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये असून यंदा 16 आयपीएल सामन्यात त्याला 22.73 च्या किरकोळ सरासरीने 341 धावा करता आल्या. यातील काही लढतीत तो सलामीला फलंदाजीला उतरला.

कोट्स

संजू सॅमसन यंदा अतिशय प्रगल्भतेने खेळत आला असून प्रतिकूल परिस्थितीत त्याने मिळवून दिलेले यश कौतुकास्पद आहे. संजू अतिशय मितभाषी आहे. नेतृत्व, यष्टीरक्षण, फलंदाजीत तो प्रभावी आहे. शिवाय, बटलरसारखा खेळाडू संघात असताना त्याने नेतृत्वात दाखवलेली चमक लक्षवेधी आहे.

-राजस्थान रॉयल्सचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट कुमार संगकारा

सिराजच्या गोलंदाजीवर सर्वाधिक षटकारांचा नामुष्कीजनक विक्रम

आरसीबीचा जलद गोलंदाज मोहम्मद सिराजला यंदा एकाच हंगामात सर्वाधिक षटकार फटकावले जाण्याच्या नामुष्कीजनक विक्रमाला सामोरे जावे लागले. यंदा सिराजच्या गोलंदाजीवर एकूण 31 षटकार मारले गेले. यापूर्वी हा विक्रम चेन्नई सुपरकिंग्सच्या ब्रेव्होच्या खात्यावर होता. 2018 आयपीएल हंगामात त्याच्या गोलंदाजीवर 29 षटकार वसूल केले गेले होते.

Related Stories

ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेतून श्रीकांतची माघार

Patil_p

कोरोनाला हरवले, सुवर्णही जिंकले!

Patil_p

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

Patil_p

गुणवान खेळाडूंचा शोध घेण्यावर निवड समितीचे लक्ष : नीतू डेव्हिड

Patil_p

न्यूझीलंडच्या ऑलिंपिक पथकामध्ये तृतीयपंथीय ऍथलीट

Patil_p

रोहित, विनेश, मनिका, थांगवेलू यांची खेलरत्नसाठी शिफारस

Patil_p