पहिल्याच दिवशी 10,000 गाडय़ांचे बुकिंग ः टाटाकडून ग्राहकांसाठी ऑफरमध्ये वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोटर्सच्या टीयागो या नव्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांचा मजबूत प्रतिसाद मिळत आहे. सदरच्या बुकिंगला सोमवारी दुपारी 12 वाजता सुरुवात झाली आणि एका दिवसात 10,000 जणांनी कारकरीता मागणी नोंदवली. टाटा मोटर्सने पहिल्या 10,000 ग्राहकांसाठी 8.49 लाख रुपये किमत ठेवली आहे. आता ते अतिरिक्त 10,000 ग्राहकांपर्यंत वाढवण्यात आले असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, ‘आम्ही टीयागो ईव्हीला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने आनंदित झालो आहोत आणि त्यासाठी आमच्या ग्राहकांचे आम्ही मनापासून आभार मानतो. ईव्ही घेण्याच्या आवडीला पाठिंबा देण्यासाठी, आम्ही सुरुवातीची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2022 पासून कारची चाचणी घेतली जाईल आणि जानेवारी 2023 पासून डिलिव्हरी सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे’.
सुरुवातीची किंमत हमी नाही
बुकिंगमुळे तुम्हाला टीयागो ईव्ही सुरुवातीच्या किमतीत मिळेल याची हमी मिळत नाही. सुरुवातीची किंमत पहिल्या 20,000 ग्राहकांसाठी आहे. पहिल्या 10,000 ग्राहकांपैकी 2000 टाटा ईव्ही टीयागो कार्स विद्यमान ग्राहकांसाठी राखीव ठेवल्या आहेत. ऑफरची पात्रता ही तारीख, बुकिंगची वेळ, कारचे मॉडेल, प्रकार आणि वर्तमान मालकी यासह अनेक घटकांवर अवलंबून असते.
पहिल्या दिवशी वेबसाइट डाउन
टीयागो ईव्हीला पहिल्याच दिवशी ग्राहकांचा इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला की वेबसाइटच डाउन झाली. अनेक ग्राहकांनी ही समस्या कंपनीकडे नोंदवली आहे. टाटाने सांगितले की, हजारो ग्राहक एकाचवेळी बुकिंगसाठी प्रयत्नात असल्याने आमची वेबसाइट मंदावली आहे.
सुरुवातीची किंमत 8.49 लाख रु.
टीयागो ईव्ही 5 रंगाच्या पर्यायासह उपलब्ध होणार आहे. त्याची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. ही ईव्ही चार्जमध्ये 315 किलोमीटरचे अंतर धावू शकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. फास्ट चार्जरने बॅटरी 80टक्क्यापर्यंत चार्ज होण्यासाठी 57 मिनिटे लागतील.