दोन मुलांनी केला 100 किमी प्रवास : आईला खांद्यावर घेत पर्वतांमध्ये पायपीट
हृदयस्पशी अशा एका व्हिडिओत केरळमधील दोन पुरुषांनी स्वतःच्या वृद्ध आईला खांद्यावर उचलून घेत तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पर्वत चढल्याचे दिसून आले आहे. पश्चिम घाटातील एक दुर्लभ फूल नीलकुरिंजी पाहण्याचे या दोघा भावांच्या आईचे स्वप्न होते. हे फूल 12 वर्षांमध्ये केवळ एकदाच फुलत असल्याचा दावा करण्यात येतो. कोट्टायम जिल्हय़ातील मुत्तुचिरा येथे राहणाऱया 87 वर्षीय एलिकुट्टी पॉल यांनी एकदा स्वतःच्या मुलाला इडुक्की या जिल्हय़ात फुललेली दुर्लभ फुले पाहण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.
एलिकुट्टी या वृद्धत्वाशी निगडित आजारांनी त्रस्त असल्याने त्यांना योग्यप्राकेर उंच पर्वतावर चढून जाणे शक्य नव्हते. अशा स्थितीत त्यांच्या राजन आणि सत्यन या मुलांनी त्यांना एका जीपमधून मुन्नारनजीकच्या कालीपारा पर्वतांच्या पायथ्यापर्यंत नेले आणि यासाठी सुमारे 100 किलोमीटरचा प्रवास केला. परंतु तेथे पोहोचल्यावर कुटुंबाला शिखरावर चढण्यासाठी चालण्यायोग्य रस्ते नसल्याचे कळले. राजन आणि सत्यन यांना स्वतःच्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याने त्यांनी स्वतःच्या वृद्ध आईला खांद्यांवर उचलून घेत पर्वतावर 1.5 किमीची पायपीट केली आहे. तेथे नीलकुरिंजी फुलांचे दर्शन त्यांनी स्वतःच्या आईला घडविले आहे. नीलकुरिंजी एक दुर्लभ फूल असून ते पश्चिम घाटात आढळून येते. आणि बारा वर्षांमध्ये केवळ एकदाच फुलत असल्याचे सांगण्यात येते.
इडुक्की जिल्हय़ातील मुन्नार हिल स्टेशन हे नीलकुरिंजी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. आता तामिळनाडूतील कोडाइकनकाल, कर्नाटकातील कोडगू आणि केरळमधील पूपरा येथेही ही फुले आढळून येतात.