ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील फिल्म इन्स्टिटय़ूट ऑफ टेलिव्हिजन संस्थेत सिनेमाऑटोग्राफीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
अनुविन अनुराग शुक्ला (वय 31) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो साल्वादोर नॉर्थ गोवा येथील रहिवासी आहे. पुण्यातील एफटीआयआयमध्ये सिनेमाऑटोग्राफच्या शेवटच्या वर्षाचे तो शिक्षण घेत होता. संस्थेच्या बॉईज हॉटस्टेलमध्येच तो वास्तव्यास होता. आज सकाळी 9 च्या सुमारास हॉस्टेलमधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा कंट्रोल रुमला फोन आला. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुमचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने हॉस्टेलच्या रुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी खिडकीला नायलॉनची दोरी बांधून शुक्ला याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्याचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. ही आत्महत्या साधारण दोन ने तीन दिवसांपूर्वी झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलिसांनी या विद्यार्थ्याचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. डेक्कन पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.