वारणानगर / प्रतिनिधी
मॅनहॅटन, न्यूयॉर्क (यूएस) इथून जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत इन्फोसिसच्या प्रेसिडेंट पदाची धुरा अत्यंत यशस्वीरित्या सांभाळणारे वारणानगर ता. पन्हाळा येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाचा केमिकल विभागाचा माजी विद्यार्थी रवी कुमार एस. यांची शुक्रवार दि. १३ रोजी ‘कॉग्निझंट’ या आयटी क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे. भारतीय म्हणून ही बाब आपणा सर्वांसाठी अभिमानाची आहेच, पण त्याचबरोबर वारणेच्या शिक्षण संमूहासह शिवाजी विद्यापीठासाठी सुद्धा ही बाब प्रचंड गौरवाची आहे. रवी कुमार यांनी १९८७ ते १९९१ या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेतील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्याने पदवी धारण केली आहे. त्यानंतर १९९६ मध्ये झेवियर्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
रवी कुमार यांचा करिअरग्राफ हा कोणालाही चकित करेल असा आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असाच आहे. १९९१ ते १९९४ या काळात बीएआरसीमध्ये त्यांनी ‘क’ वर्ग सायंटिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर प्राईसवॉटरहाऊसकूपर्स या प्रख्यात कंपनीत सिनिअर कन्सल्टंट, केंब्रिज टेक्नॉलॉजी पार्टनर्स येथे असोसिएट डायरेक्टर व सीआरएम लाईन मॅनेजर, ऑरॅकल कॉर्पोरेशनमध्ये बिझनेस हेड (साऊथ ईस्ट एशिया), सेपियंट कॉर्पोरेशनमध्ये डायरेक्टर (सीआरएम व एससीएम व्हॅल्यू सेट्स), इन्फोसिसमध्ये सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट आणि पुढे प्रेसिडेंट अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेललेल्या आहेत. इन्फोसिसचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी विविध विभागांचे ग्लोबल हेड आणि एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य, इन्फोसिस फौंडेशन, इन्फोसिस बीपीएम, इन्फोसिस पब्लिक सर्व्हिसेस आदींचे चेअरमन ऑफ बोर्ड म्हणूनही काम पाहिले आहे. त्याशिवाय, एडव्हान्ससीटी, डिजीमार्क, यूएस चेंबर ऑफ कॉमर्स, इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम, ट्रान्सयुनियन आदी जागतिक संस्था-संघटनांवर संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत.
त्यांच्या या सातत्याने उंचावत राहिलेल्या कारकीर्दीला कॉग्निझंटच्या सीईओ पदामुळे यशाची आणखी एक सोनेरी किनार लाभलेली आहे. ब्रायन हंप्रिझ यांच्याकडून ते पदाचा कार्यभार स्वीकारतील. ब्रायन १५ मार्चपर्यंत कंपनीत विशेष सल्लागार म्हणून कार्यरत राहणार आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार रवी कुमार यांचे बेसिक वेतन १ मिलीयन अमेरिकी डॉलर असले तरी त्यांना मिळणाऱ्या विविध पर्क्स विचारात घेता एकूण वेतन हे ७ मिलियन डॉलरच्या घरात असेल.युवा मित्र दिनेश कुडचे याने रवी कुमार यांच्या निवडीची माहिती सर्वप्रथम दिली.
रविकुमार एस. यांच्या जागतिक स्तरावरील निवडी बद्दल वारणा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, इंजीनिअरींगचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.आणेकर, सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी तसेच फार्मसीचे प्राचार्य डॉ जॉन डिसोझा यानी आनंद व्यक्त करून वारणेसाठी ही बाब गौरवाची व भावी शिक्षण घेणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारी असल्याचे सांगीतले.

