प्राचार्य डॉ. आनंद देशपांडे यांचे प्रतिपादन : बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचा स्थापना दिन उत्साहात : मराठा मंदिर सभागृहात कार्यक्रम


प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण क्षेत्रात नवनवीन अभ्यासक्रम येऊ लागले आहेत. नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे. जुन्या टेक्नॉलॉजी टाळून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षणात नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा त्या दिशेने कल वाढला पाहिजे, असे विचार प्राचार्य डॉ. आनंद देशपांडे यांनी काढले.
बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचा स्थापना दिवस मंगळवारी मराठा मंदिरच्या सभागृहात साजरा झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप चिटणीस, डॉ. अजित कुलकर्णी, प्राचार्य सुनील कुसाणे, प्राचार्य सुभाष देसाई, प्राचार्य एम. बी. हुंदरे आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रास्ताविक वर्षा महाजन यांनी केले. स्वागत हेरवाडकर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले. यावेळी डॉ. अजित कुलकर्णी, दिलीप चिटणीस यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय पातळीवर क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी झालेल्या 11 विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
शिवाय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी डान्स, गायन, नाटकांचे सादरीकरण केले. या सादरीकरणाला रसिकांचा प्रतिसाद मिळाला. यामध्ये मराठी टेनिंग कॉलेज, हेरवाडकर स्कूल आणि जे. एन. भंडारी स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
याप्रसंगी अलका कुलकर्णी, गणेश कलघटगी, पंकज शिवलकर, हेमांगी प्रभू यासह पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन वर्षा महाजन यांनी केले. आभार वरदा फडके यांनी मानले.