पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांचे आवाहन
प्रतिनिधी /म्हापसा
आपल्या स्कूल, कॉलेजमध्ये किंवा बाहेर कुणीही विद्यार्थी अमलीपदार्थ सेवन करीत असल्यास वा आणत असल्यास त्याची माहिती त्वरित शाळेतील शिक्षकांना द्या जेणेकरून शिक्षक वर्ग त्या विद्यार्थ्यावर कारवाई करू शकेल. अशी माहिती देणाऱयांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. विद्यार्थ्यांनी अमलीपदार्थापासून दूर राहावे, असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी केले.
अमलीपदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून कोलवाळ येथील श्री राम विद्यामंदिर स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्सविषयी जनजागृती व्हावी यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर हळर्णकर एज्युकेशन सोसायटीच्या तथा डायगो वाझ उच्च माध्यमिकच्या प्रमुख माधवी हळर्णकर, राम विद्या मंदिराच्या मुख्य प्रतिनिधी जॉयना मोंतेरो, सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी बसवराज कट्टी उपस्थित होते.
केस संपल्यावर अमलीपदार्थांची विल्हेवाट लावली जाते
अमलीपदार्थाची ओळख कशी घ्यावी असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपअधीक्षकांना केला असता गांजा, चरस यांची माहिती व फोटो दाखवत ते गोव्यात उपलब्ध असतात असे ते म्हणाले. कोकेन पांढरा पावडर असतो असे ते म्हणाले. हेरॉईन इंजिक्शनद्वारे घेतात आदी माहिती दिली. अमलीपदार्थ ताब्यात घेतल्यावर त्याचे पुढे काय केले जाते असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला असता ते म्हणाले की, प्रथम आम्ही सॅम्पल घेऊन प्रयोगशाळेत पाठवतो त्याचा अहवाल न्यायालयात येतो, अमलीपदार्थ समिती मुख्य सचिव न्यायाधीशच्याखाली असते. केस संपल्यानंतर त्या अमलीपदार्थाची विल्हेवाट लावली जाते, असे त्यांनी सांगितले.
कोलवाळ पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांनी स्लाईडद्वारे विविध प्रकारच्या अमलीपदार्थाची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या शंकाचे निरसन केले. यावेळी बसवराज कट्टी यांनीही अमलीपदार्थाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. यापासून दूर राहावे असे सांगितले. माधवी हळर्णकर यांनी सर्वांचे स्वागत करीत पोलिसांच्या या उपक्रमाबद्दल आभार मानले.