प्रतिनिधी/ बेळगाव
शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंडळाने ऑनलाईन बसपास प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. विद्यार्थ्यांनी सेवासिंधू पोर्टल hhps:sevasindhuservices.karnataka.gov.in वर अर्ज करावा, असे आवाहन परिवहनने केले आहे.
सध्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने जुन्या बसपासची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली आहे. मात्र यंदा नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पासअभावी पैसे मोजावे लागत आहेत. याची दखल घेत परिवहनने बसपास प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. बसस्थानकाच्या काऊंटरवर कर्मचाऱयांची नियुक्ती करून बसपास प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने बसपास देण्यासाठी बसपास विभागाची धडपड सुरू झाली आहे.