Tarun Bharat

विषय सतत संसारचक्र फिरते ठेवत असतात

Advertisements

अध्याय एकविसावा

भगवंत म्हणाले, मनुष्य विवेकशून्य होऊन केवळ मूढ बनला म्हणजे त्याला विषयही मिळत नाहीत आणि परमार्थही साध्य होत नाही अशी त्याची स्थिती होते. सन्मार्गाची वाट न कळल्याने पदोपदी आत्मघात मात्र होत असतो. विषयांचे चिंतन करता करता तो स्वतःची ओळख विसरून जातो.

विषयाच्या आसक्तीमुळे तमोगुणाने वृत्तीला ग्रासून टाकल्याने कोणतीच आठवण राहात नाही. मी कोण हेही मनाला स्मरत नाही! मनुष्यप्राणी भ्रमाने भुललेला असतो. भ्रम झाल्यामुळे त्याला भलभलतेच आठवते. त्याला कशाचीच नीट आठवण असत नाही. त्यामुळे प्राणी संकटात कुचंबत असतात.

निजलेला मनुष्य आपलेपणाचे भान विसरून स्वप्नात जसा घाबरतो आणि मी रणात पडलो असे म्हणतो, त्याप्रमाणेच हे सारे प्राणी भुललेले आहेत. मुक्मयाच्या नाकात चिलट शिरले असता तो घाबरून जाऊन बेबें फेंफें करीत बसतो, काय झाले हे कळत नाही, व्यर्थ हाकाहाक करतो, त्याची खटपट ज्याप्रमाणे व्यर्थ होते त्याप्रमाणे दुःखाच्या आवेशाने प्राणी विव्हळ होतात व सन्मार्ग न कळल्यामुळे मोह मदाने भुलून मुकेपणाने विव्हळत पडतात.

अहंकाराच्या जोराने शरीरात वारे भरते व तेच बाधक होऊन ते आडमार्गाला लागून खोल विहिरीत पडतात. तेल्याचा बैल जसा डोळय़ावर झापड बांधून केवळ शरीराने सारा वेळ चालत असला, तरी त्याची वाट म्हणून काही सरत नाही. स्वतःभोवतीच गोल गोल फिरत राहतो, पण पहावयाला गेले तर त्याच्या त्या फिरण्याला काही शेवटच नसतो. घाण्याच्या भोवती फिरून फिरून अंगातील भोवंडही जिरून गेलेली असते. त्याप्रमाणे विषय हे सतत संसारचक्र फिरते ठेवत असतात. त्यातील विधीची माया कळत नाही. अमावास्येचा अंधार जसा काळा भिन्न असतो, त्याप्रमाणे माणूस जड मूढ व स्तब्ध होतो. त्याला आप-पर भान राहात नाही. साऱया जगात अंधत्व पसरते. लोहाराच्या भात्याप्रमाणे फुकट श्वासोच्छ्वास मात्र होत असतात. वृक्ष जसे तटस्थ उभे असतात, त्याप्रमाणे मनुष्य धड जिवंत नाही व मेलेलेही नाही असा तटस्थ होऊन राहतो. सकाम कर्में करणाराला स्वर्गप्राप्ती होते असे वेदात सांगितले आहे पण तेसुद्धा लोभिष्ट लोकांचेच म्हणणे आहे. लहान मुलाने औषध घ्यावे म्हणून त्याला प्रलोभन दाखवावे लागते, त्याप्रमाणे वेदांमध्ये सांगितलेली फलश्रुती वास्तविक कल्याणकारक नसली, तरी मोक्षाविषयी रूची निर्माण करणारी असते. मूर्ख लोक निष्काम असे कर्म कधीच करीत नाहीत, म्हणून वेदाने त्यांना फलश्रुती दाखवून स्वकर्माला प्रवृत्त केले आहे. सकाम कर्म करणे आणि निष्काम कर्म करणे या दोहीची क्रिया सारखीच असते पण सकाम व निष्काम कर्माच्या फलाचा हेतु मात्र वेगवेगळा असतो. ज्याप्रमाणे स्वातीचे जळ शिंपीत पडले तर मोती होते, पण तेच सर्पाने प्राशन केले तर दुर्धर विष होऊन राहते. त्याप्रमाणे आपली कल्पना निष्काम बुद्धीने मुक्तपणाला पोचविते आणि सकामबुद्धीने दृढतर बंधनास पात्र करते. वेदाने स्वर्गाचे जे फळ सांगितले आहे, ते काही मुख्य नव्हे तर ती जाणूनबुजून केलेली फसवणूक आहे. गुळात घोळलेले औषध घेतल्याने क्षयरोग नाहीसा होतो त्याप्रमाणे, वेदाने स्वर्गफळाची आशा दाखवून मूर्खांना मुक्त करण्याकरिता स्वधर्माचरण लावून दिले आहे. आता तू म्हणशील की, कर्मवादी जे आहेत ते वेद हा प्रवृत्तीपर आहे असे म्हणतात तर त्याच वेदाचा अर्थ निवृत्तीपर आहे हे कसे खरे मानावे? वेद जर प्रवृत्तीपर असता, तर वेद हा अनर्थकारक होऊन बसला असता! मुळात वेद हे मनुष्याचे कल्याण व्हावे म्हणून सांगितले आहेत. माणसांना स्वतःचे भले कळत नसल्याने ती जन्मतःच स्वतःचे अकल्याण करणाऱया विषय, इंद्रिये आणि आप्तेष्टांमध्ये आसक्त असतात. आपले परम कल्याण न जाणणाऱया व देवादी योनिरूप पापमार्गात भटकणाऱया किंबहुना आणखी पापे करून वृक्षपाषाणादी योनीत जाणाऱया माणसांचा हितचिंतक असलेला वेद त्याना विषयात कसा प्रवृत्त करील?

क्रमशः

Related Stories

जागतिक संकेतामुळे सेन्सेक्स-निफ्टी तेजीत

Patil_p

आयटीसीचा समभाग 17 टक्क्यांनी वधारला

Patil_p

बायोकॉनचा नफा घटला

Patil_p

चार श्रीमंत व्यावसायिकांच्या संपत्तीत वाढ

Patil_p

आता रिलायन्समधील अंबानी कुटुंबाची हिस्सेदारी वाढली

tarunbharat

आला 7000 एमएएच बॅटरीचा मोबाईल

Patil_p
error: Content is protected !!