राष्ट्रपतीपद निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचे पारडे जड ः संजद-बीजेडीनंतर वायएसआर रेड्डी यांचाही पाठिंबा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी रालोआच्यावतीने राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेसचे नेते उपस्थित होते. आता त्या प्रचाराला प्रारंभ करणार असून विविध राज्यांमधील मतदार असलेल्या खासदार-आमदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्याला मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत. सद्यस्थितीत मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.
द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी दाखल करण्यापूर्वी संसदेतील महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना आदरांजली वाहिली. त्यांनी 4 सेटमध्ये उमेदवारी दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, लालन सिंग, पशुपती पारस, रेणू देवी आणि तारकिशोर प्रसाद हे द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी प्रस्तावक आहेत.
सोनिया, ममता, पवारांशी केली चर्चा
द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह प्रमुख विरोधी नेत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत आपल्या उमेदवारीबाबत माहिती दिली. त्या वैयक्तिकरित्या सर्वांशी बोलल्या असून उमेदवारीपूर्वी त्यांचा पाठिंबा मागितला. तसेच उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहण्याची विनंतीही केली.
वायएसआर काँग्रेस मुर्मू यांच्या पाठिशी
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. तसेच व्यस्त वेळापत्रकामुळे आपण मुर्मू यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याप्रसंगी उपस्थित राहू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, राज्यसभा खासदार विजयसाई रेड्डी आणि लोकसभेचे खासदार पी. व्ही. मिधुन रेड्डी हे त्यांच्या पक्षाचे दोन प्रतिनिधी उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित होते.
अन्य पक्षांचाही मुर्मू यांना पाठिंबा
ओडिशाच्या बिजू जनता दलाने आधीच मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्सनेही (एमडीए) पाठिंबा जाहीर केला आहे. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम या आरएसएसच्या संघटनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमसिंग तमांग यांनीही मुर्मू यांच्या पाठिशी राहण्याचा पवित्रा जाहीर केला आहे. बिहारमधून नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलापाठोपाठ हिंदुस्थानी अवाम मोर्चानेही पाठिंबा जाहीर केला आहे.