देशातील सर्वात मोठी बोरवेल रेस्क्यू ऑपरेशन ः 100 तास अडकला होता मुलगा
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडच्या जांजगीर-चांपा जिल्ह्य़ात बोरवेलमध्ये अडकून पडलेल्या राहुलला 106 तास चाललेल्या बचावमोहिमेनंतर मंगळवारी रात्री उशिरा सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. बोरवेलमधून बाहेर काढण्यात आल्यावर त्याला विलासपूर येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुल शुक्रवारी दुपारी सुमारे 2 वाजता 60 फूट खोल बोरवेलच्या खड्डय़ात कोसळला होता. प्रशासन, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि सैन्याने ही बचावमोहीम कुठलीही विश्रांती न घेता सुरू ठेवली होती. हे देशातील सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन असल्याचे बोलले जातेय. यापूर्वी हरियाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये 21 जुलै 2006 रोजी 50 फूट खोल बोरवेलमध्ये कोसळलेल्या 5 वर्षीय प्रिन्सला 50 तासांमध्ये वाचविण्यात आले होते.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल बचाव मोहिमेवर देखरेख ठेवून होते. मंगळवारी रात्री उशिरा त्यांनी सोशल मीडियावर बचावमोहीम यशस्वी ठरल्याची माहिती दिली. मोहिमेदरम्यान बोरवेलच्या खड्डय़ात एक साप देखील पोहोचला होता असे बघेल यांनी सांगितले. राहुलला खड्डय़ातून बाहेर काढताच जवानांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. तर लोकांनी एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि सैन्याच्या जवानांना उचलून घेत त्यांच्या कौतुकाचा वर्षाव केला आहे.
कॅमेऱयाद्वारे ठेवली जात होती नजर
5 दिवसांमध्ये राहुलवर विशेष कॅमेऱयाद्वारे नजर ठेवली जात होती. त्याला अन्नपाणी पुरविण्यात येत होते. त्याचा धीर कायम ठेवण्यासाठी त्याच्याशी सातत्याने संभाषण केले जात होते. 5 दिवसांपर्यंत 60 फूट खोल खड्डय़ात अडकून राहिल्याने त्याच्या शरीरात अशक्तपणा आहे.
बचाव मोहिमेचे स्वरुप
सैन्याने बचावमोहिमेची धुरा हातात घेतली होती. भुयाराद्वारे ते प्रथम बोरवेल आणि मग राहुलपर्यंत पोहोचले. मुलगा खड्डय़ात असल्याने दगड ड्रिलिंग मशीनऐवजी हातांनी फोडण्यात आले. राहुलला बाहेर काढल्यावर त्याची प्रकृती डॉक्टरांच्या पथकाने तपासली होती. भुयारापासून रुग्णवाहिकेपर्यंत कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. एनडीआरएफ पथकाला विश्रांती देण्यासाठी जवानांनी मोहिमेची धुरा हाती घेतली होती.