प्रतिनिधी /वास्को
बायणातील सासमोळे भागातील नाल्यामध्ये पडलेल्या गाभण गायीची अग्नीशामक दल, पालिका कामगार व स्थानिक युवकांनी सुटका केली. ही गाय जवळपास आठ तास या नाल्यात पडून होती. गुरे नाल्यात पडण्याची या भागातील ही सातवी घटना आहे.
सासमोळे बायणातील या उघडय़ा नाल्यात गुरे पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यांचा जीव वाचवण्यासाठी स्थानिक लोकांना कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे हा नाला सुरक्षीत करावा अशी मागणी लोकांकडून बऱयाच वर्षांपासून होत आहे. शुक्रवारी सकाळी एक गाभण गाय या नाल्यात कोसळली. तीला बाहेर येता येईनासे झाल्याने ती चिखल्यातच बसून राहिली. ती गाभण असल्याने तीला जबरदस्तीने बाहेर काढणेही धोक्याचे ठरले होते. त्यामुळे अग्नीशामक दल व पालिका कामगारांना बोलावण्यात आले. स्थानिक युवकांनीही सहकार्य केले. त्यामुळे तीला बाहेर काढणे शक्य झाले. हे बचावकार्य यशस्वी करण्यास जवळपास आठ तास लागले.