प्रणित कल्याणशेट्टी बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात प्रथम
प्रतिनिधी/ बेळगाव
आई-वडिलांनी दिलेली प्रेरणा व शिक्षकांनी घेतलेली मेहनत यामुळे बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळाले. शिक्षकांवर श्रद्धा व विश्वास ठेवल्यास यशस्वी वाटचाल करता येते, हे मी अनुभवले. दररोज 5 ते 6 तास अभ्यास केल्यामुळे मला यश मिळाल्याचे जीएसएस कॉलेजचा विद्यार्थी प्रणित विजय कल्याणशेट्टी याने सांगितले.
प्रणित याने 594 (99 टक्के) गुण मिळवित बेळगाव शैक्षणिक जिह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. टिळकवाडी येथील जीएसएस कॉलेजचा तो विद्यार्थी आहे. विज्ञान शाखेच्या या विद्यार्थ्याने पीसीएनसीमध्ये 100 टक्के गुण मिळविले आहेत. पुढील काळात याला इंजिनिअरिंग पूर्ण करून एमटेकचे शिक्षण पूर्ण करावयाचे आहे. शिक्षण घेऊन सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअर करावयाचा विचार असल्याचे त्याने ’तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
अभ्यासक्रमासोबतच आवडी-निवडीही जपल्याचे तो सांगतो. ‘गोल्डन व्हॉईस ऑफ बेलगाम’ या स्पर्धेमधून आपली गाण्याची आवड त्याने जपली आहे. कॉलेजचे प्राचार्य प्रणव पित्रे यांनी केवळ सहकार्यच केले नाही तर प्रत्येकवेळी योग्य मार्गदर्शन केले. किरण ठाकुर यांनी एसकेई सोसायटीमध्ये अनेक बदल केले असून यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अधिक सोयीचे झाल्याचे त्याने सांगितले.