क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
बेंगळूर येथे झालेल्या दुसऱया राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बेळगावच्या फास्ट बॉक्सफिट क्लबच्या खेळाडूंनी 3 रौप्य, 3 कांस्यपदके पटकावली. बेंगळूर येथे एचएमटी मैदानावर घेण्यात आलेल्या दुसऱया राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत निशान कदमने 48 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत अरूण कुमार व उपांत्य फेरीत कौशिक के. बेंगळूर यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम फेरीत त्याला पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदक मिळाले.
रोशन पाटीलने 57 किलो वजनी गटात, अक्षय कदमने 51 किलो वजनी गटात, तर मोहम्मद कैफने 63.5 किलो वजनी गटात रौप्य व कांस्य पदके पटकाविली. अमित कांबळेने युवा विभागात 54 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. 14 वर्षाखालील सबज्युनियर गटात मंथन फगरेने 63 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. मंथनने प्रथमच या स्पर्धेत भाग घेऊन पदक पटकावले.
या स्पर्धेत बेळगाव फर्स्ट बॉक्सफिटच्या 9 बॉक्सिंगपटूंनी भाग घेतला होता. वरील सर्व खेळाडूंना बॉक्सिंग एनआयएस प्रशिक्षक गजेंद्र त्रिपाठी व सत्येंद्र त्रिपाठी यांचे मार्गदर्शन व संघव्यवस्थापक संदीप यादव, कार्तिक पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.