क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
पदवीपूर्व शिक्षण खाते व रविंद्रनाथ टागोर पदवीपूर्व महाविद्यालय आयोजित तालुकास्तरीय पदवीपूर्व क्रीडा स्पर्धेत ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाने विविध क्रीडा प्रकारात यश संपादन केले.
जिल्हा क्रीडांगणावर आयोजित क्रीडा स्पर्धेत मुलांच्या खो खो अंतिम सामन्यात ज्योती संघाने मराठा मंडळ पदवीपूर्व संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. या संघातील हर्ष धामणेकर, रोहित पाटील, विराज पाटील, नारायण कलखांबकर व आदित्य पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मुलींच्या अंतिम सामन्यात ज्योती संघाने मराठा मंडळ संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. या संघातील रसिका कंग्राळकर, सानिका चिठ्ठी, प्रणाली बिजगरकर, श्वेता कालकुंद्रीकर, अंशिका हर्दी या खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले.
मुलींच्या कबड्डी स्पर्धेतही ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. तृप्ती गुरव, वैष्णवी लोहार, विजया पाटील, ऋतीका लोहार, साधना चौगुले या खेळाडूंनी उत्तम खेळाचे प्रदर्शन घडविले. मात्र मुलांच्या कबड्डी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. वैयक्तिक क्रीडा प्रकारात सानिका चिठ्ठीने 100 मि. धावण्याच्या स्पर्धेत दुसरा, साधना चौगुलेने उंच उडीत प्रथम, तिहेरी व लांब उडी व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत स्नेहा कोरजकरने तृतीय, क्रॉसकंट्री स्पर्धेत सानिका पाटीलने द्वितीय तर पणाली कोरजकरने चौथा, 400 व 800 मी. धावण्याच्या स्पर्धेत रसिका कंग्राळकरने तृतीय तर क्रॉसकंट्रीमध्ये पाचवा, नंदकिशोर मोदगेने क्रॉसकंट्रीमध्ये तृतीय क्रमांक, अभिषेकने भालाफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयाचे प्राचार्य आर. डी. शेलार व प्राध्यापकांचे प्रोत्साहन तर क्रीडा प्राध्यापक आर. डी. हदगल यांचे मार्गदर्शन लाभले.