बेळगाव : ऍपटेक एव्हिएशन अकादमीच्या मराठी व कन्नड माध्यमातून शिकलेल्या व ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या सहा यशवंत विद्यार्थ्यांचा मंगळवारी अकादमीतर्फे सत्कार करण्यात आला. रोटेरियन कीर्ती सुरंजन प्रमुख पाहुण्या होत्या तर केएलई बी. व्ही. बेल्लद महाविद्यालयाचे प्राचार्य नरसिंहा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रवीण सदलगी, शुभांगी गिरबिडे, मुस्कान मुल्ला, थामोदरम, तस्मिया मुल्ला यांची विविध एअरलाइन्ससाठी विमानतळांवर निवड झाली आहे.
ऍपटेक एव्हिएशनचे संचालक विनोद बामणे यांनी अकादमीद्वारे दिल्या जाणाऱया प्रात्यक्षिक प्रशिक्षणाची माहिती दिली आणि सांगितले की, ग्रामीण पार्श्वभूमी किंवा स्थानिक माध्यमातील बहुतांश विद्यार्थी विमान वाहतूक आणि आदरातिथ्य उद्योगात यश संपादन करत आहेत. कीर्ती सुरंजन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या तरुणांचे यश खूप उत्साहवर्धक आहे. ‘ग्रामीण विद्यार्थी आणि पालकांनी ऍपटेक एव्हिएशनच्या रोजगाराभिमुख प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन केले. कार्यक्रमास ज्योती बामणे, प्रकाश पाटील व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.