डीआरडीओची कामगिरी ः जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम
वृत्तसंस्था / चांदीपूर
भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन अन् विकास संस्थेने (डीआरडीओ) मंगळवारी व्हर्टिकल लाँच शॉर्ट रेंज सरफेस-टू-एअर (व्हीएल-एसआरएसएएम) क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. ओsडिशाच्या चांदीपूर येथील इंटीग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये या क्षेपणास्त्राचे परीक्षण करण्यात आले. हे क्षेपणास्त्र देशातच तयार करण्यात आले आहे.
या परीक्षणानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, नौदल आणि संबंधित शास्त्रज्ञांचे कौतुक केले. हे क्षेपणास्त्र भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविणारे ठरणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. हे परीक्षण नौदलाच्या युद्धनौकेवरून करण्यात आले आहे. या परीक्षणादरम्यान क्षेपणास्त्राने लक्ष्याला मार्गातच नष्ट केले आहे. व्हीएल-एसआरएसएएमला डीआरडीओने डिझाइन अन् विकसित केले आहे.
रडारला चकवा देण्याची क्षमता
या क्षेपणास्त्रात स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेंसी सीकर बसविण्यात आला असल्याने याची अचूकता आणखी वाढली आहे. हे क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी येत असलेल्या विविध प्रकारच्या हवाई धोक्यांना जलदपणे नष्ट करते. याचा वेग आणि फायर पॉवर घातक असल्याने हे क्षेपणास्त्र रडारला चकवा देऊ शकते. या क्षेपणास्त्राचे वजन 154 किलोग्रॅम असून याची लांबी सुमारे 12.6 फूट आहे. या क्षेपणास्त्राचा वेग 4.5 मॅक इतका आहे.
50 किलोमीटरवरून हल्ला
हे क्षेपणास्त्र स्वतःचा वेग, अचूकता आणि फायर पॉवरसाठी ओळखले जाते. व्हीएल-एसआरएसएएम क्षेपणास्त्राला 40 ते 50 किलोमीटर अंतरापर्यंत आणि सुमारे 15 किलोमीटरच्या उंचीपर्यंत हल्ला करण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आले आहे. याचे डिझाईन अस्त्र क्षेपणास्त्रावर आधारित आहे. व्हिज्युअल रेंजव्यतिरिक्त हवेतून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे.
विशेष क्षमता
व्हीएल-एसआरएसएएम क्षेपणास्त्र 360 अंश कोनात वळून शत्रूचा खात्मा करू शकते. या क्षेपणास्त्राचे परीक्षण डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लेबोरेटरी (डीआरडीएल), हैदराबादमधील आरसीआय अन् आरअँडडी इंजिनियर्सच्या वरिष्ठ संशोधकांनी यांच्या देखरेखीत पार पडले आहे.