आयआयटी मद्रासकडून विकसित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मोबाईल ऑपरेटिंगचा उल्लेख झाल्यास गुगलचे अँड्रॉइड किंवा ऍपलच्या आयओएसचे नाव समोर येते, परंतु आता यात भारताचे नावही जोडले गेले आहे. भारताने स्वतःची पहिली स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम भारोस (बीएचएआरओएस) विकसित केली आहे. याचे परीक्षण आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही केले आहे.
आयआयटी मद्रासमध्ये विकसित भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम भारोसचे मंगळवारी यशस्वी परीक्षण करण्यात आले. माहिती-तंत्रज्ञान मंत्री वैष्णव आणि शिक्षणमंत्री प्रधान यांनी याचे परीक्षण व्हिडिओ कॉलवर केले आहे. याचबरोबर वैष्णव यांनी भारोसच्या टीमला काही सूचनाही केल्या आहेत. या प्रवासात अनेक अडचणी येतील, जगभरात अनेक लोक या समस्या तुमच्यासमोर घेऊन येतील असे वैष्णव यांनी भारोस टीमला उद्देशून म्हटले आहे.
अशाप्रकारची कुठलीही सिस्टीम यशस्वी होऊ नये असा या अडचणी निर्माण करणाऱयांची इच्छा असणार आहे. याचमुळे या ऑपरेटिंग सिस्टीमला अत्यंत सावधपणे आणि प्रचंड परिश्रमाने यशस्वी ठरविण्याच्या दिशेने काम करावे लागणार आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम विदेशी ऑपरेटिंग सिस्टीमवरील निर्भरता कमी करण्यास मदत करणार असल्याचे वैष्णव म्हणाले.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या ऑपरेटिंग सिस्टीमवरून एक ट्विट केला आहे. मेड इन इंडिया मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम भारोसचे यशस्वी परीक्षण पार पडले आहे. भारतात सशक्त, स्वदेशी, आत्मनिर्भर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिजन पूर्ण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रधान यांनी म्हटले आहे.