दोन पीठांसाठी दोन उत्तराधिकाऱयांची निवड
द्वारका / वृत्तसंस्था
द्वारका शारदा आणि ज्योतीर्मठ बद्रीनाथ पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या उत्तराधिकाऱयांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यांचे रविवारी वयाच्या 99 व्या वर्षी देहावसान झाले होते. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर मध्यप्रदेशातील नरसिंहपूर आश्रमात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी असंख्य श्रद्धाळू उपस्थित होते. अनेक केंद्रीय मंत्री आणि राजकीय नेत्यांनीही त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. ते दोन पीठांचे शंकराचार्य होते. त्यांच्या पार्थिवाला नरसिंहपूर येथील परमहंसजी गंगा आश्रमात भूसमाधी देण्यात आली.
आता स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या उत्तराधिकाऱयांची निश्चिती करण्यात आली असून उपलब्ध माहितीनुसार स्वामी अविमुक्तेश्वरानंदजी यांची ज्योतीर्मठ बद्रीनाथ पीठ आणि स्वामी सदानंदजी यांची यांची द्वारका शारदा पीठासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. स्वामी स्वरुपानंद यांच्या पार्थिवासमोरच त्यांचे स्वीय सचिव सुबोधानंद महाराज यांनी या उत्तराधिकाऱयांच्या नावांची घोषणा केली आहे. या दोन्ही उत्तराधिकाऱयांनी ‘दंडी स्वामी’ ही उपाधी प्राप्त केली आहे. स्वतः स्वामी स्वरुपानंद सरस्वती हेही शंकराचार्य होण्यापूर्वी ‘दंडी स्वामी’ झाले होते. त्यांनी शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून दंड सन्यास दीक्षा घेतली होती. त्यानंतर 1981 मध्ये ते उत्तराखंड येथील ज्योतीर्मठ बद्रीनाथ पीठाचे शंकराचार्य बनले. यासाठी त्यांना कायदेशीर संघर्षही करावा लागला होता. त्यांनी अनेकदा तथाकथित बनावट शंकराचार्यांवर टीका केली होती. ते स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते.