मागील 15 दिवसांत 300 रुपयांनी वाढ केल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड
प्रतिनिधी/ बेळगाव
हेस्कॉमकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱया रेग्युलर मीटरच्या किमतीत अचानक वाढ करण्यात आली. मागील 15 दिवसांत 300 रुपयांनी वाढ करण्यात आल्याने याचा नाहक भुर्दंड ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे ग्राहकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
वर्षातून दोनवेळा विद्युत बिलात वाढ केल्यानंतर आता मीटरच्या दरातही वाढ केली जात आहे. नवीन मीटर बसविताना यापूर्वी ग्राहकांना 671 रुपये मोजावे लागत होते. आता मात्र 934 रुपये भरून घेतले जात आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून मीटरच्या दरात अचानक वाढ करण्यात आली. यामुळे आधीच हेस्कॉमकडून सर्व दरात वाढ झाली असताना आता मीटर दरातही वाढ झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
जुन्या मीटरच्या बदलीस नकार
कंत्राट संपल्याने आता नवीन कंपनीकडून वीज मीटरची खरेदी हेस्कॉमकडून केली जात आहे. मीटरची वॉरंटी 5 वर्षांची असल्याने जुने मीटर जळल्यानंतर अथवा निकामी झाल्यानंतर बदलून देणे गरजेचे असते. परंतु नवीन कंपनी मात्र मीटर बदलून देण्यास टाळाटाळ करीत आहे. यामुळे अनेक विद्युत मीटर हेस्कॉमच्या कार्यालयात पडून आहेत. यावर तोडगा काढण्याची मागणी ग्राहकांमधून होत आहे.
विद्युत मीटरचा तुटवडा
रेल्वेस्टेशन समोरील हेस्कॉम कार्यालयात विद्युत मीटरचा तुटवडा जाणवत आहे. थ्री फेज व ई-टीव्ही मीटर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची धावपळ सुरू आहे. यामुळे ग्राहकांची कामे खोळंबली जात असून, विद्युत मीटरचा सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.