Tarun Bharat

एफआरपी अधिक 350 रूपये घेणारच-राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा

-21 व्या ऊस परिषदेत हजारो शेतकऱयांची उपस्थिती
-मागील वर्षाचे दोनशे रुपये न दिल्यास 17 नोव्हेंबर पासून ऊस तोड रोखणार
-कारखान्यांच्या काटामारीवर सडकून टिका
रियाज ट्रेनर -7660 – जयसिंगपूर येथील 21 व्या ऊस परिषदेत स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱयांनी हात उंचावून एकीची वज्रमुठ दाखवली. तसेच ऊस परिषदेत केलेल्या मागण्यांवर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
7654- ऊस परिषदेसाठी उपस्थित शेतकरी.

प्रतिनिधी, जयसिंगपूर
Raju Shetti : चालू गाळप हंगामात उसाला एफआरपी अधिक 350 रुपये घेतल्याशिवाय संघटना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. मागील वर्षाच्या उसाचे बिल एफआरपी अधिक दोनशे रुपये तातडीने द्यावे, अन्यथा सतरा नोव्हेंबरपासून कारखाने बंद पाडू असेही त्यांनी कारखानदारांना ठणकावून सांगितले.

स्वाभिमानेच्यावतीने शनिवारी 21 वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे पार पडली. त्यामध्ये त्यांनी ऊस दराबरोबरच काटामारीचा खरपूस समाचार घेतला. कारखानदारांना हिशोब तातडीने पूर्ण करण्यास भाग पाडावे यासाठी येत्या सात नोव्हेंबरला पुण्याच्या साखर आयुक्त कार्यालयात भव्य मोर्चा काढणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. परिषदेत एकूण 13 ठराव करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना दरवर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणती भूमिका घेते याकडे राज्याचे लक्ष असते. यावर्षीही शेट्टी हे दराबाबत आक्रमकच राहणार अशीच शेतकऱ्यांची भावना होती. दुपारी तीन वाजता एकविसाव्या ऊस परिषदेस सुरुवात झाली. माजी खासदार राजू शेट्टी, संदीप जगताप, जालंदर पाटील, प्रकाश पोकळे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. स्वागत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष शैलेश आडके तर प्रास्ताविक प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केले.

डॉ जालिंदर पाटील यांनी कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिह्यात 2004 ते 2017 या कालावधीत 99 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, ही अस्वस्थ करणारी घटना असल्याचे सांगितले. मिठाईवाला पंधरा रुपयाची साखर घेऊन दोनशे पन्नास रुपये मिळवतो. परंतु शेतकऱ्यांला त्याच्या घामाचा पैसा मिळत नाही. दुधाच्या दराप्रमाणेच आता प्रत्येक बांधावर जाऊन उसाची रिकव्हरी बघूनच त्याचा दर ठरवावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या धोरणावर टीका करून आता बारामतीत होणारी सभा नक्कीच शेतकऱ्यांना न्याय देणारी ठरेल असे सांगितले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना राज्य कार्यकारिणी सदस्य अण्णासाहेब चौगुले यांनी जोपर्यंत उसाचा दर ठरणार नाही तोपर्यंत कांडीला कोयता लागू देऊ नका असे आवाहन केले.

साखर कारखानदार आणि काटामारी या धोरणावर कडाडून टीका करत राजू शेट्टी म्हणाले, काटामारीतून 200 दरोडेखोर साडेचार हजार कोटीचा दरोडा घालतात. तरीही सगळी यंत्रणा डोळे झाकून गप्प असते. साखर कारखानदारांना शेतकऱ्यांनी बाहेरून वजन करून आणलेले चालत नाही. त्यामुळे आता याचा जाब विचारण्यासाठी मी थेट पोलीस महासंचालकांनाच भेटणार आहे. जर देशातील हजारो पेट्रोल पंपावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा काम करत असेल तर राज्यातील दोनशे साखर कारखाना वर काटामारीवर नियंत्रण ठेवण्यास यंत्रणेला काय अडचण आहे असा सवाल त्यांनी केला.

शेट्टी म्हणाले, प्रश्न तेच समस्या त्याच तरीही आपण 21 वर्षे परिषद घेऊन लढा करीत आहोत. पण लढय़ामुळे काही ना काही पदरात पडलेच आहे. शेतकयांनी केवळ ऊस परिषदेला हजेरी लावून संघटना मजबूत होणार नाही. त्यासाठी परिषदेत ठरलेल्या ठरावाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज आहे. आपल्यावर सुरुवातीच्या काळात सहकार चळवळ मोडीत काढत आहेत, असा आरोप केला. परंतु एकूण राज्यातील स्थिती पाहता सर्वाधिक सहकारी साखर कारखाने फक्त कोल्हापूर जिह्यातच राहिले आहेत. यावरून आमचा लढा हा सहकार चळवळ मजबूत करण्यासाठीच झाला आहे हे सिद्ध होते.

हेही वाचा- देशाची वाटचाल पुरोगामी विचाराने व्हावी-श्रीमंत शाहू छत्रपती यांचे प्रतिपादन


साखर कारखानदाराकडे इथेनॉल विक्रीतून मिळालेल्या पैशामुळे प्रत्येकांच्याकडे कोटय़ावधी रुपयाचा निधी शिल्लक आहे. या निधीतून ते सहजपणे गेल्या वर्षीच्या ऊस दरापोटी एफआरपी पेक्षा दोनशे रुपये देऊ शकतात. यासाठी आता कारखानदारांनी हिशोब मांडून तो आयुक्तालयाकडे सादर करणे गरजेचे आहे. साखर आयुक्त कार्यालयाने याबाबत कारखानदारांना हा हिशोब पूर्ण करण्यास भाग पाडावे यासाठीच आता थेट पुण्याच्या सहकार आयुक्त कार्यालयावर धडक मारणार आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही आम्ही तब्बल एक महिन्याची संधी कारखानदारांना देत आहोत. येत्या 17 नोव्हेंबर पर्यंत जर मागील वर्षाचे दोनशे रुपये मिळाले नाहीत तर संपूर्ण ऊसतोड रोखली जाईल.

मागील वर्षी इथेनॉल निर्मितीतून प्रत्येक साखर कारखानदाराकडे प्रति टन 380 रुपये इतकी शिल्लक राहिली आहे. यावर्षी इथेनॉलला दर अधिकच मिळेल. आम्ही यावर्षी जाणाऱ्या उसाला एफ आर पी अधिक 350 रुपये दराची मागणी करत आहोत आणि ही रक्कम घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मेळाव्यास कोल्हापूर सांगलीसह सीमा भागातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा- 7 नोव्हेंबर ला पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयावर धडक, राजू शेट्टीची घोषणा

भंगार भावाने सोन्याची कांडी विकू नका
यावर्षी ऊसाला सोन्याच्या कांडीचा भाव येणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने थोडा संयम पाळावा. सोन्याची कांडी भंगाराच्या दराने विकू नका. यावर्षी शेतकऱ्यांचा भुईमूग सोयाबीन भात या सर्व सर्वच पिके हातातून गेले आहेत. त्यामुळे ऊस पिकातून त्याचा मोबदला घ्यावा असे आवाहन श्री शेट्टी यांनी यावेळी केले.

कोल्हापूरमुळे दहा हजार कोटी रुपये
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले. परंतु ते द्यायचे नावच काढत नव्हते. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आवाज उठवला. एक दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा आंदोलन करून शासनास शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य देण्यास भाग पाडले. खरे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे दहा हजार कोटी रुपये देण्यामध्ये कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचाच मोलाचा वाटा आहे.

त्याने पांग फेडले
पंढरपूरच्या एका युवकाने संघटनेसाठी 1 लाख 25 हजार रुपयांचा निधी सुपूर्द केला. राजू शेट्टी यांच्याबरोबर पंढरपूर पदयात्रेत सहभागी झालेला हा युवक वडिलांच्या आत्महत्येनंतर पुन्हा जोमाने उभा राहिला. त्याला राजू शेट्टी यांनी बळ दिले आणि त्यातूनच तो हॉटेल व्यवसायात यशस्वी झाला. याच व्यवसायातून झालेला फायदा त्य़ाने संघटनेला दिला. संकटग्रस्त शेतकऱ्य़ां च्या मुलांना यातून बळ मिळू दे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Related Stories

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे निधन

Tousif Mujawar

अॅस्ट्राझेनेका कंपनीने सिरमला ‘या’ कारणासाठी बजावली कायदेशीर नोटीस

Archana Banage

आज ‘रेल रोको’ आंदोलनाची हाक

Patil_p

नागपूर – रत्नागिरी महामार्गासाठी जमिण मोजणी भुये परिसरातील शेतकऱ्यांनी पाडली बंद

Abhijeet Khandekar

मोदी-शाह यांच्यासोबत संघाची बैठक

Patil_p

पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

Tousif Mujawar
error: Content is protected !!