साताऱ्यात 20, कोल्हापुरात 21 आणि सांगलीत 23 रोजी बैठका
शिवाजी विद्यापीठाचा लोगो वापरावा, ही विनंती
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाचा 2024-25 ते 2028-29 मधील पंचवार्षिक बृहत आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात आवश्यक त्या शैक्षणिक सुविधांसाठी सुचना मागवल्या आहेत. यासंदर्भात साताऱ्यात 20 मार्च, कोल्हापुरात 21 मार्च आणि सांगलीत 23 मार्चला बैठका आयोजित केल्या आहेत. या बैठकांना उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी केले आहे.
शिवाजी विद्यापीठ क्षेत्रात येत्या 5 वर्षांत आवश्यक प्रस्तावाचा आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे.त्यासाठी कार्यक्षेत्रातील तीन जिल्ह्यात नवीन महाविद्यालये, विद्याशाखा,अभ्यास पाठ्याक्रमांची निश्चिती केली जाणार आहे.तसेच शैक्षणिक क्षेत्रासह अन्य क्षेत्रांतील विविध घटकांशी चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी समित्या स्थापन केल्या आहेत.त्यानुसार सातारा येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात 20 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातील गोपालकृष्ण गोखले महाविद्यालयात 21 रोजी सकाळी 11 वाजता तर सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात 23 रोजी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यात आयोजित या बैठकांना विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शैक्षणिक संस्था प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि अन्य घटकांनी उपस्थित राहावे. तसेच नवीन महाविद्यालये, विद्याशाखांसाठी स्थळ सुचवावे. याची माहिती समन्वयकांना द्यावी, आलेल्या सुचनांचा अभ्यास करून पंचवार्षिक बृहत आराखड्यात समावेश केला जाणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी दिली आहे.