Tarun Bharat

काकती-होनगा भागात सुगी हंगाम अंतिम टप्प्यात

बेन्नाळी, घुग्रेनट्टी, देवगिरीतील सुगी हंगाम आटोपला : खोड किडीमुळे भातपिकात 20 टक्के घट शक्य,  कामगार वर्गाचा तुटवडा

अरुण टुमरी /काकती

काकती परिसरातील सुगी हंगाम येत्या आठवडय़ात संपणार आहे. होनगा परिसरात गेले पंधरा दिवस सुगी हंगामाची धांदल उडाली आहे. बेन्नाळी, घुग्रेनट्टी, देवगिरीतील सुगी हंगाम आटोपला आहे. उत्तरा नक्षत्रात हवामानातील बदल व पोसवण्याच्या वेळेला झालेला पाऊस यामुळे काकती शिवारातील काही भागात खोड कीड व भात पिकात दळे पडणाऱया हॉपर बर्नमुळे उत्पादनात 20 टक्के घट झाली आहे. तर होनगा, बेन्नाळी, देवगिरी, घुग्रेनट्टी शिवारात भाताचे उत्पादन भरघोस झाले आहे.

स्वतःचा सुगी हंगाम साधण्यासाठी घरचे मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे शेतीत कामगार वर्गाचा तुटवडा भासत आहे. काकती-होनग्यात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने शेतीत कष्ट उपसायला मजूर व शेतकऱयांची मुले तयार नाहीत. महिला मजूर वर्गावर शेतकऱयांना अवलंबून रहावे लागत आहे. भात सुगीतील मिळणारी मजुरीसुद्धा दुपटीने वाढली आहे. यामुळे भात शेतीवर उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. उत्पादन खर्चाशी ताळमेळ जमत नसल्याने भातशेती तोटय़ात चालली आहे.

ऊस लागवडीकडे कल

 मात्र पोटरीच्या अगोदरपासूनच खोड किडीमुळे पिकाचे नुकसान झाले. दाणे भरण्याच्यावेळी हॉपर बर्नदळे पडण्याच्या किडीला पीक बळी पडले. भातशेती परवडत नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून मार्कंडेय साखर कारखान्याचा ट्रायल गळीत हंगाम सुरू झाल्यापासून ऊस पिकाच्या लागवडीकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे. काकती-होनगा परिसरात 350 एकरात उसाचे पीक घेण्यात येत आहे. काकती पश्चिम विभाग, मासेनट्टी ते गंगेनळ आदी मिळून 1230 एकर तर होनगा, बेन्नाळी व जुमनाळ आदांसह 920 एकरात भातपीक घेण्यात आले आहे.

श्रम कमी मजुरी अधिक

गेल्या 44 वर्षात येथील शेतकरी अल्प व मध्यम भू-धारक झाला असल्याने घरोघरी शेतीशिवाय काम, उद्योग, व्यवसाय व नोकर वर्ग निर्माण झाला आहे. शेतीपेक्षा इतर कामधंद्यात शारीरिक श्रम कमी असून मिळणारी मजुरी अधिक आहे. लहान शेतकरी आपल्या मुलांना शेतीव्यतिरिक्त इतर कामधंद्यात गुंतवून शेतीत मजुरांकडून कामे करून घेत आहेत.

यांत्रिकीकरणामुळे खर्चात वाढ

भातकापणी, मळणी, भातवारे देण्याचे कामदेखील मशीनने करण्यात येत आहे. भाताची पोती भरून घरी आणणे हेसुद्धा टेम्पो, ट्रक्टरने करत आहेत. सारा खर्च भात उत्पन्नाच्या खर्चातील 30 टक्के झाला आहे. तर पूर्वी सारी कामे मनुष्यबळावर व बैलगाडीने केली जात होती. तेव्हा मळणीचा खर्च केवळ 10 टक्के होता. तो आता यांत्रिकीकरणामुळे 30 टक्के झाला आहे.

भातशेती तोटय़ात

भात पेरणीपूर्व मशागत ते पेरणी, कोळपणी, भांगलण, तणनाशक, कीटकनाशक, अतिपावसाने होणारे नुकसान इथंपर्यंत 60 टक्के खर्च होतो आणि भातकापणी, मळणी वाहतूक मिळून 30 टक्के एकूण 90 टक्के खर्च होतो. केवळ 10 टक्क्यात भातशेती कशी परवडणार, असा प्रश्न उपस्थित होतो. तोटय़ात चाललेल्या या भातशेतीमुळे शेतकऱयांना भातशेती करणे नकोशे झाले आहे. त्यासाठी उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणे आवश्यक आहे.

Related Stories

नुकसानग्रस्तांची कागदपत्रे कृषी अधिकाऱयांकडे सुपूर्द

Amit Kulkarni

कपिलेश्वर तलाव विसर्जनासाठी सज्ज

mithun mane

अफवेमुळे बँकेमध्ये प्रचंड गर्दी

Patil_p

आरपीडी चौकातील खोदाईमुळे देशमुख रोड बंद

Amit Kulkarni

मणप्पुरम गोल्डमध्ये चोरीचा प्रयत्न

Patil_p

बेळगाव विमानतळावर पोलिसांकडून मॉक ड्रील

Amit Kulkarni